# Sunday Sepcial हम सेल्फिश हो गये हैं

रितेश आनंद
रितेश आनंद

नागपूर : सुरवातील कोरोनाबाबत पूर्ण माहिती नव्हती. जागृतीही झाली नव्हती. त्यामुळे एकप्रकारचा बेफिकरीपणा होता. त्यामुळे संख्या झपाट्याने वाढत गेली. सुरवातीलाच याविषयी जनजागृती झाली असती तर बऱ्याच अंशी यावर नियंत्रण मिळविता आले असते. मात्र, संख्या वाढत गेली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अशी गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे वाटले नव्हते.

केरळ आणि महाराष्ट्राची तुलना केली तर लक्षात येईल की सुरवातीला केरळमध्ये संख्या अधिक होती. मात्र, त्यांनी यावर बरेच नियंत्रण मिळविले. त्याला काही कारण आहेत. महाराष्ट्रात इतर राज्यातून आणि परदेशातून सर्वाधिक लोक येतात, त्यामुळेही येथे रुग्ण संख्या वाढण्यास हातभार लागला. गंभीरता लक्षात आल्यावर यातून बाहेर यायचे हे मनाशी ठरविले आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यायची हे निश्‍चित केले. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे कळून चुकले. कारण घरातील एका व्यक्तिला कोरोना झाल्यास त्याची झळ इतरांना बसू शकते, या कल्पनेनेच मन शहारत होते. माझ्या घरी पत्नी आणि लहान मुलगा असल्याने कायम भीती वाटत होती. कोरोनाची संख्या वेगाने वाढू लागल्यावर श्रमिक ट्रेन सुरू झाल्या आणि माझी ड्यूटी फलाटावर लावण्यात आली. त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागत होती. मास्क घालणे, कुणालाही स्पर्श न करणे, कार्यालयात बसण्याची जागा सॅनिटाईज करून घेणे अशा बाबी स्वतःच करून घेत होतो.

कोरोनामुळे मानसीकतेत तर बदल झाला आणि नित्यक्रमातही बदल केला. कारण हे सर्व काही स्वतःसाठी करायचे आहे, याची जाणीव असल्याने तसे करणे अनिवार्य होते. कोरोनाने आम्हाला सेल्फ डिपेंडन्ड बनविले असे म्हटले तर वावगे ठरू नये. खाण्यापिण्याची सवयी बदलण्यास बाध्य केले. खूप खोलवर विचार करण्यास भाग पाडले. कोरोनामुळे आणखी शिस्तबद्धता आली. यांपैकी अनेक गोष्टी जर आम्ही नियमीतपणे करू लागलो तर जीवनात खूप फरक पडेल असे मला वाटते.
महत्त्वाचे म्हणजे आर्थिक ताळेबंद कसा बसवावा, ही बाब शिकवली. कारण कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांना आर्थिक फटका बसला. मला तो फटका बसला नसला तरी वायफळ खर्च टाळता येईल, हा विचार मी केला. पूर्वी हा विचार मी कधी करीत नव्हतो. कारण भौतिक सुख हवे असल्याने अनेक बाबींवर पैसा खर्च करीत होतो. आता खर्च करताना काही वेळ विचार करतो.

कोरोनाच्या अनेक नकारात्मक बाबी खूप असल्या तरी काही सकारात्मक बाबीसुद्धा आहे. विशेष म्हणजे नोकरी, स्पर्धा किंवा मित्रमंडळी यामुळे घरी फार वेळ देत नव्हतो. कोरोनाच्या निमित्याने जास्तीत जास्त वेळ मुलासोबत घालवत आहे. त्यामुळे वेगळेच समाधान मिळत आहे. तसेच वेळेचा सदुपयोग करीत आहे. फिटनेस हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग असला पाहिजे. त्यामुळे सध्या मैदानावर जाऊन व्यायाम करता येत नसल्याने सायकलिंग करून फिटनेस कायम ठेवत आहे. प्रत्येकाने या काळात आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला पाहिजे. घरी राहूनही चांगल्या पद्धतीचा व्यायाम करता येतो. त्यामुळे आपली प्रतिकार शक्तीही वाढेल आणि याचा फायदा कोरोनाशी लढताना होईल.

हम सेल्फिश हो गये हैं
श्रमिक ट्रेन सुरू झाल्यावर माझी ड्यूटी फलाटावर लावण्यात आली होती. त्यावेळी ट्रेन आल्यानंतर प्रवाशांना फळे योग्य पद्धतीने मिळतात की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे काम माझ्याकडे होते. यावेळी फारच विचीत्र अनुभव आले. अनेक लहान मुले रडत असायची परंतु त्यांना कुणी हात लावत नव्हते. इच्छा असूनही आम्ही जवळ जाऊ शकत नव्हतो. अनेक प्रवासी एकमेंकाकडे संशयाच्या नजरेने पाहत असत. अशा नकारात्मक काळात काही प्रसृतीच्याही घटना घडल्या. त्यात धोका असतानाही आम्ही मदतीसाठी पुढाकार घेतला. कोरोना येण्यापूर्वी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत एकत्र बसणे, थट्टामस्करी करणे, एकत्र जेवण करणे, एकमेंकांच्या डब्यातील पदार्थ घेणे हे सर्व करीत होतो. मात्र, कोरोना आल्यावर आम्ही प्रत्येक जण सेल्फिश झालो. हे इतके वाईट होते की एकत्र बसणारे आम्ही सहकारी आता एकटे जेवण करतो. कुणालाही आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीला हात लावू देत नाही..दोन हात लांबूनच बोलतो. हे सर्व वाईट आहे, याची मला जाणीव आहे. मात्र, परिस्थितीने प्रत्येकाला सेल्फिश बनविले आहे तसेच आत्मनिर्भर बनविले आहे, असे अनुभवावरून मी म्हणू शकतो.

कोण आहे रितेश आनंद

झारखंडमधील बोकारो येथील. आता मध्य रेल्वे नागपूर येथे कार्यरत. राष्ट्रकूल, आशियायी क्रीडा स्पर्धा, दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धा, आशियायी ऍथलेटिक्‍स स्पर्धेत रीले शर्यतीतील पदकविजेता धावपटू.

संपादन - नरेश शेळके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com