बिल्डर, रुग्णालयांना मनपाचा दणका

बिल्डर, रुग्णालयांना मनपाचा दणका

नागपूर : सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर परवानगीशिवाय बांधकाम साहित्य ठेवणारे बिल्डर तसेच सर्व साधारण कचऱ्यात बॉयोमेडिकल कचरा टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला. गेल्या दोन वर्षांत 129 बिल्डर व 23 वैद्यकीय व्यावसायिकांवर दंड ठोठावत महापालिकेने त्यांना चांगलाच धडा शिकवला. 
11 डिसेंबर 2017 ते 10 ऑक्‍टोबर 2019 या दोन वर्षांत दहाही झोनमधील पथकाद्वारे सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा आदी ठिकाणी विनापरवानगी बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या 6930 व्यक्तींवर व 129 बिल्डर्सवर अशा एकूण 7059 जणांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यांवरील बांधकाम हटविण्यासाठी या बिल्डर तसेच नागरिकांना 48 तासांचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतरही ते हटविल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बिल्डरकडून 8 लाख 29 हजार रुपये दंड वसूल केला. बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवणाऱ्या 6930 व्यक्तींकडून 1 कोटी 17 लाख 42 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याच दोन वर्षांच्या कालावधीत दवाखाने, रुग्णालयांमध्ये निर्माण होणारा बॉयोमेडिकल कचरा वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत सर्वसाधारण कचऱ्यामध्ये टाकण्यात आल्याप्रकरणी उपद्रव शोध पथकाने 23 वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई केली. दहाही झोनमध्ये 23 वैद्यकीय व्यावसायिकांकडून 2 लाख 19 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 
विशेष म्हणजे, मंगळवारी सीताबर्डी येथील एका वैद्यकीय व्यावसायिकामार्फत बॉयोमेडिकल कचरा सर्वसाधारण कचऱ्यात टाकण्यात आल्याने धरमपेठ झोनच्या उपद्रव शोधपथकाने त्यांच्यावर 25 हजार रुपये दंड ठोठावला. स्वच्छता निरीक्षक जयंत जाधव, उपद्रव शोधपथकाचे धरमपेठ झोन टिम लिडर आशीष कटरे यांच्यासह झोनच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोधपथकाचे स्कॉड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून स्वच्छ, सुंदर शहर संकल्पनेमध्ये अडसर निर्माण करणाऱ्यांना अंकुश लावण्यासाठी पालिकेचे उपद्रव शोधपथक कार्य करीत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com