esakal | निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

बोलून बातमी शोधा

निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल
निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल
sakal_logo
By
मोहन सुरकार

सिंदी (जि. वर्धा) :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात अक्षरशः थैमान घातले आहे. दिवसागणिक बाधितांची संख्या आटोक्‍यात बाहेर जात आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणसुद्धा लाक्षणिक वाढले आहे. आप्त स्वकीयांच्या निधनाने शहरवासीयांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या वेळी वारंवार भेटी घेणारे लोकप्रतिनिधी शोधूनही सापडत नसल्याने सिंदीकरात लोकप्रतिनिधींबाबत रोष पहायला मिळत आहे.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

मागील वर्षी मार्च महिन्यात सुरू झालेल्या पहिल्या कोरोना लाटेची ग्रामीण भागात तीव्रता कमी पाहायला मिळाली. अख्खा वर्षभरात शहरात बाधितांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच होती. शिवाय हे सर्व बाधित दुरुस्त सुद्धा झाले. यापैकी एकाचेही निधन झाले नव्हते. मात्र, वर्षभरानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. बाधितांचा आकडा दररोज नवनवीन विक्रम घडवीत आहे. मोठ्या शहरात उपचारासाठी मारामारी सुरू आहे. बेड आणि आवश्‍यक औषधांचा प्रचंड तुटवडा झाला आहे. त्यात भर म्हणून काय तर रुग्णांना लागणाऱ्या ऑक्‍सिजनच्या कमीमुळे अनेक रुग्णांची बिकट परिस्थिती झाली आहे.

ग्रामीण भागाचीसुद्धा अवस्था काही वेगळी नाही. पहिल्या लाटेत केवळ शहरातच वास्तव्य असणारा कोरोना गावखेड्यात आणि छोट्या शहरात घुसून शिरकाव करून प्रत्येक दारावर दस्तक देत आहे.

ग्रामीण भागात दिवसागणिक रुग्ण संख्या प्रचंड वाढत असून गोरगरीब जनतेचा कोरोनाने अशरक्षः छळ मांडला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लॉकडाउन लावल्याने प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच घरातील सर्वच्या सर्व बांधीत होत असल्याने हातावर आणणे आणि पानावर खाणाऱ्यांसमोर दुहेरी प्रश्‍न निर्माण झाला आहे. आर्थिक चणचण, खाण्याचे वांधे झाल्याने नागरिक त्रस्त आहे.

शहरातील खासगी रुग्णालयात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, ज्यांना आर्थिक अडचणींमुळे खासगी डॉक्‍टरची सेवा परवडत नाही. त्या गोरगरिबांना सरकारी रुग्णालयाचाच आसरा आहे. मात्र, शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा "रामभरोसे" डोलारा पाहता आणि येथील व्यवस्था पाहता उपचार करणारा देवाच्याच धावा करतो. अशा अराजक परिस्थितीमुळे शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशावेळी सर्वांना हक्काचा आणि आपले रडगाणे ऐकणारा जवळचा माणूस वाटतो, तो म्हणजे आपला लोकप्रतिनिधी. निवडणूक प्रसंगी वारंवार भेटी घेणारे, आश्वासनांची खैरात वाटणारे लोकप्रतिनिधी आज मात्र, अशा अडचणींच्या प्रसंगी शोधूनही सापडत नसल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे. परिणामतः शहरवासीयांत लोकप्रतिनिधी बाबत प्रचंड प्रमाणात रोष पहायला मिळत आहे.

हेही वाचा: दिग्रस तालुक्‍यातील वेअर हाउसला भीषण आग; तब्बल दोन कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

आरोग्य सुविधांचा अभाव

रुग्णांची वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अपुरे मनुष्यबळ आणि आरोग्य यंत्रणेला क्षमतेबाहेर करावे लागणारे काम. हा डोलारा किती काळ चालणार. शेवटी येथे काम करणारेसुद्धा माणसच आहे. याशिवाय शहरात एकही भरतीची सोय असणारे हॉस्पिटल नाही, सीटी स्कॅनची सोय नाही, रक्ताच्या विविध चाचण्याची सोय नाही, अशाही परिस्थितीत धन्य ते येथील खासगी डॉक्‍टर जे येथील रुग्णांचा उपचार करून त्यांना दिलासा देत आहे. दिलासाच नाही तर असंख्य रुग्ण ठणठणीत सुद्धा केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ