
यवतमाळ : शहरातील कचराप्रश्नांवर नगरसेवक आक्रमक झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च होऊन शहरात अस्वच्छता आहे. या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. मार्च महिन्यात उपोषण केल्यानंतरही तोडगा निघाला नाही. परिणामी, आता नगरसेवकांनी पाच एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत आहे. या स्थितीतही शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. घंटागाडी व्यवस्थापनाबाबतही कोणाचे लक्ष नाही. कंत्राटदारांचा कंत्राट संपल्यामुळे तोही लक्ष देत नाही. आरोग्य विभागाकडून त्याची दखल घेतली जात नाही. कचराप्रश्नाबाबत शहरातील नागरिक रोज तक्रारी करीत आहेत.
शहरात अनेक भागात कचरा तसाच शिल्लक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. संबंधित कंत्राटदाराचा कंत्राट 26 नोव्हेंबरला संपला आहे. परिणामी, नवीन कंत्राटासाठी निविदाप्रक्रिया होण्याच्यादृष्टीने प्रस्ताव पाठविला आहे. यावर अजूनही निर्णय झालेला नाही. या प्रकरणात नगरसेवकांची बदनामी होत आहे. यासर्व प्रकाराविरोधात सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले आहेत.
आठ मार्चला नगरसेवक उपोषणाला बसले होते. त्यानंतर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर नगरसेवकांनी उपोषण मागे घेतले. मात्र, अजूनही कचराप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाच एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या पत्रावर कॉंग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, भाजप नगरसेवक प्रा. डॉ. अमोल देशमुख, शिवसेनेचे गटनेते गजानन इंगोले यांच्या स्वाक्षरी आहेत.
कचराप्रश्न सुटेना
मागील कित्येक महिन्यापासून शहरातील कचऱ्याचा प्रश्न बिकट रुप धारण करून आहे. घंटागाडी नियमित येत नाही. कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर मिळत नाही. सफाईकामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे वारंवार कामबंद आंदोलन केले जाते. कचराडेपो बंद आहे. अशा अनेक अडचणीमुळे आमरण उपोषणाचा इशारा सर्वपक्षीय नगरसेवकांनी दिला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.