आदिवासींच्या कोट्यवधी रुपयांवरही मारला डल्ला 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

आदिवासींना वितरित करायच्या डिझेल इंजिन व गॅस युनिट योजनेत गैरव्यवहार झाला असल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात 2012 मध्ये दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठित केली.

गडचिरोली : आदिवासी लाभार्थ्यांना डिझेल इंजिन व गॅस या साहित्यांचे वाटप न करताच त्यासाठी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात 1 कोटी 1 लाख 39 हजार रुपयांच्या रकमेची अफरातफर झाल्याचा ठपका गायकवाड समितीने ठेवला आहे. 2004 ते 2009 या कालावधीतील हा प्रकार आहे. या प्रकरणाची 29 जानेवारी रोजी अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे तत्कालीन सात व्यवस्थापक व एका वीजतंत्री कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

डिझेल इंजिन, गॅस युनिट योजनेत गैरव्यवहार

आदिवासींना वितरित करायच्या डिझेल इंजिन व गॅस युनिट योजनेत गैरव्यवहार झाला असल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात 2012 मध्ये दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठित केली. या समितीने चौकशी केली असता, अहेरी व भामरागड तालुक्‍यातील 1 हजार 194 लाभार्थ्यांना तेलपंपाचे वितरण करायचे होते. त्यापैकी 254 लाभार्थ्यांना तेलपंपाचे वितरण न करता सुमारे 48 लाख 76 हजार 800 रुपयांची उचल केली.

 

अवश्‍य वाचा- धक्कादायक! वर्ध्यात चक्क शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

 

संस्थेने डिझेल पंपाची वाहतूकच केली नाही

डिझेल पंपांची वाहतूक करण्याची जबाबदारी आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्था नंदूरबार यांना दिली होती. या संस्थेने डिझेल पंपाची वाहतूक केली नाही. तरीही वाहतुकीचा खर्च म्हणून 10 लाख 65 हजार 409 रुपये उचल केले. तसेच भामरागड व अहेरी तालुक्‍यातील नागरिकांसाठी 4 हजार 465 गॅस युनिटचे वितरण करायचे होते. त्यापैकी 1 हजार 566 गॅस युनिटचे वितरण न करता 41 लाख 96 हजार 880 रुपयांच्या रकमेचा अपहार केला. यामध्ये डिझेल इंजिन व गॅस युनिट असा एकूण 1 कोटी 1 लाख 39 हजार 89 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका गायकवाड समितीने ठेवला आहे. 

अहेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

याबाबत उपप्रादेशिक कार्यालय अहेरीचे विद्यमान व्यवस्थापक आशीष श्रीधर मुळेवार यांनी अहेरी पोलिस स्टेशनमध्ये 29 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. अहेरी पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम 409, 34 अन्वये ऋषी सोनबा धारणे (रा. पाथरी, ता. सिंदेवाही), नंदू झुंगरू येरमे (रा. आकापूर, ता. मूल), पृथ्वीराज रामभाऊ वाघमारे (रा. व्यंकटेशनगर यवतमाळ), नत्थू नागाजी खेटाळे (रा. एकलव्यनगर यवतमाळ), देवनाथ सावजी गावडे (रा. नवेगाव, ता. गडचिरोली), जयराम सवाईराम राठोड (रा. सावरगाव, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम), मारुती थोटूजी सिडाम (रा. आमिर्झा, ता. गडचिरोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्वजण 2004 ते 2009 या कालावधीत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक होते. तर आरोपी नागेश बिच्छू मडावी (रा. साई सुमन अपार्टमेंट, चंद्रपूर) हा वीजतंत्री म्हणून त्याच कालावधीत कार्यरत होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corruption of billions of rupees of Tribals