पणन महासंघाची खरेदी 25 कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर महासंघाने 25 कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी केली आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची खरेदी गेल्या काही दिवसांतच 46 हजार क्विंटलवर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच केंद्रांवर महासंघाने 25 कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी केली आहे. त्यापोटी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अडीच कोटी रुपयांचा चुकारा जमा झालेला आहे. 

25 कोटीच्या घरात 

महाराष्ट्र राज्य पणन महासंघाने जिल्ह्यात पाच केंद्रांवर कापूस खरेदी सुरू केलेली आहे. यंदा पणन महासंघाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी बाजारात कापसाचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. शासकीय केंद्रांवर पाच हजार पाचशे रुपये दराने कापूस खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पहिली पसंती पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रालाच मिळत आहे. जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 45 हजार 925 क्विंटलचा काटा झालेला आहे. ही रक्कम 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. 

पाच केंद्रांवर कापूस खरेदी

शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट ही रक्कम पाठविली जात आहे. आतापर्यंत दोन कोटी 41 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केंद्रांवर झालेली आहे. त्यामुळे पणन महासंघाची कापूस खरेदी यंदा चांगली होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या पाच केंद्रे सुरू झालेली आहेत. येत्या काही दिवसांत केंद्रांची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना अडचण होऊ नये, म्हणून केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे पणन महासंघाचे म्हणणे आहे. 

आर्णी येथे सर्वाधिक शेतमाल

आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 29 हजार क्विंटल कापसाची खरेदी आर्णी येथे झालेली आहे. या ठिकाणी दोन जिनिंगवर कापसाची खरेदी केली जात आहे. यवतमाळ केंद्रावर चार हजार 142, पुसद येथे सहा हजार 214, कळंब चार हजार 298, तर खडगा (ता. महागाव) येथील केंद्रावर दोन हजार 373 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cotton Federation buys Rs 25 crore