पांढरं सोनं पिकविण्यापासून विक्रीपर्यंत येतो तब्बल इतका खर्च; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र खर्च अधिक अन् उत्पन्न कमी

Cotton production and labor costs read cotton story
Cotton production and labor costs read cotton story

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून सर्वदूर ओळख आहे. मात्र, देशात हा जिल्हा आता शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कारण, सर्वाधिक आत्महत्या याच जिल्ह्यात होत असल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे शेतकरी आणि संकट हे समीकरण मागील काही वर्षांपासून चांगलेच जुळले आहे. अशातही शेतकरी पेरणीचे कामे करीत असतो. चला तर जाणून घेऊया एका एकरात कापसाचे उत्पादन घेण्यासाठी किती खर्च येतो.

मागील काही वर्षांत पांढरे सोनेच शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे. यंदाही पीक जोमदार दिसत असताना आलेल्या बोंडअळी, बोंडसडने शेतकऱ्यांना रडविले. नागरवायी ते कापूस वेचून घरी आणेपर्यंत शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी केले. एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस झाला. कापूस बाजारात नेल्यावर मालाला मिळत असलेला भाव बघून डोळ्यात पाणी आले.

शेतकऱ्यांना नागरवायी, कचरा वेचाई, बियाणे, खत, फवारणी खरेदी करावी लागते. त्यासाठी मजुरांची जुळवा-जुळव करून टोबणी करावी लागते. खत, निंदण, फवारणीनंतर कापूस वेचाई आणि त्यानंतर कापूस घरी आल्यावर विक्रीसाठी खरी कसरत सुरू होते. यंदा शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे अनेकांनी पाच हजार ४०० ते पाच हजार पाचशे या भावाने खासगीत कापूस विक्री करण्यास पसंती दिली.

शेतकरी आणि संकट हे समीकरण मागील काही वर्षांपासून चांगलेच जुळले आहे. केवळ आशावादी राहून शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांना एकही हंगाम साथ देत नाही, हे वास्तव आहे. तरीही शेतकरी पेरणी करण्यास घाबरत नाही. उसनवारी करून शेतात राबराब राबूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही येत नाही.

यंदाच्या खरीप हंगामातही कपाशीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चांगलेच बिघडविले आहे. एकरी खर्च ३५ ते ४० हजार आणि उत्पन्न दहा ते पंधरा हजार, अशी स्थिती आहे. कापूस लागवडीत एकरी केलेला खर्च आणि हातात पडलेले उत्पन्न यात बरीच तफावत आहे.

खरेदीत प्रतवारीवर ‘बोट’

पीक जोमदार दिसत असताना आलेल्या बोंडअळी, बोंडसडने उत्पन्नात घट झाली. शेतकऱ्यांनी बाजार समितीत ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, शासकीय खरेदी उशिरा सुरू झाली. परिणामी शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगीत विक्री केला. कापसाच्या प्रतवारीवर बोट ठेऊन कमी भाव मिळाला. शासकीय खरेदी केंद्रावर नाकारलेला कापूस खासगीत कमी भावात विक्री करावा लागला.

शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं

खरीप हंगामात सर्वाधिक कपाशीची पेरणी केली जाते. कापसासाठी नागरवायी, कचरावेचाई, बियाणे बॅग, डरवणी, कापूस वेचाई आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो.  मात्र, यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या पिकांमुळे सर्वत्र नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. प्रत्यक्षात त्यांच्या दुखण्यावर वरून मलमपट्टी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुखणे अधिकच वाढत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

एकरी येणारा सरासरी खर्च

काम खर्च (रुपयात)
नागरवायी १०००
कचरावेचाई ५००
बियाणे बॅग ७५०
टोबणी खर्च ५००
खत ५०००
निंदण ५०००
डरवणी ५०००
पाच फवारणी १००००
कापूस वेचाई ४०००
वाहन खर्च २०००
रखवाली १०००
एकूण खर्च ३४,७५०


संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com