कापूस खरेदी केंद्र सुरूच झाले नाही, व्यापारी घेताहेत शेतकऱ्यांचा फायदा

रूपेश खैरी
Saturday, 7 November 2020

घरी आलेला कापूस ठेवून असल्याने आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी तो विकण्याच्या मनस्थितीत आहे. शिवाय पावसाने ओला झालेला कापूस काळा पडण्याची अधिक शक्‍यता आहे. याच संधीचा लाभ घेत गाव व्यापारी त्यांच्याकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी करण्याची संधी साधत असल्याचे दिसून आले आहे.

वर्धा : दिवाळसण तोंडावर आला आहे. असे असतानाही कापूस खरेदी सुरू होण्याचे संकेत दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे. निसर्गाच्या माऱ्याने त्रस्त झालेला शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचे कळताच त्याच्या या विवंचनेचे भांडवल गावव्यापारी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून हे व्यापारी कमी दरात कापूस घेत असल्याने त्यांची लूट होत आहे.

यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला. खोडकिडीमुळे सोयाबीन गेले. कपाशीवर बोंडअळी आली. यामुळे उत्पादनात घट होणे निश्‍चित आहे. अशात घरी आलेला कापूस ठेवून असल्याने आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी तो विकण्याच्या मनस्थितीत आहे. शिवाय पावसाने ओला झालेला कापूस काळा पडण्याची अधिक शक्‍यता आहे. याच संधीचा लाभ घेत गाव व्यापारी त्यांच्याकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी करण्याची संधी साधत असल्याचे दिसून आले आहे.

अशात जर शासकीय कापूस खरेदी सुरू झाली; तर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, शासनाकडून खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय नाही. सीसीआयकडून अद्याप कापूस खरेदी संदर्भात निर्णय घेण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. पणन महासंघाकडून केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. पण, खरेदीसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसावर खासगी व्यापाऱ्यांची चंगळ सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत होत असून शेतकऱ्यांकरिता कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे.

अवश्य वाचा : गर्भवतीच्या मृत्यूनंतर होणार वाळू तस्करीचा तपास; आमदारच म्हणतात, तस्करांना नेत्यांचे अभय

खासगी खरेदीत व्यापाऱ्यांची मर्जी

सध्या काही जिनिंग मालकांकडून खासगी खरेदी सुरू करण्यात आली आहे. या खरेदीत हमीभावापेक्षा कमीच दर मिळत असल्याचे दिसून आले आहे. सध्या आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी व्यापाऱ्याला कापूस देण्याकरिता तयार झाला आहे. बोंडअळी व इतर किडीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सीसीआय व कापूस पणन महासंघाने तत्काळ खरेदी सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

वर्ध्यात केंद्र वाढविण्याची मागणी

गत वर्षी झालेल्या गोंधळामुळे यंदा कापूस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात आतापर्यंत 60 हजारावर शेतकऱ्याकडून नोंदी करण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी वर्ध्यात सीसीआयने सहा तर कापूस पणन महासंघाने दोन केंद्र सुरू करण्याची माहिती दिली आहे. यामुळे वर्ध्यात कापूस खरेदी केंद्र वाढविण्यासह शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जाणून घ्या :  खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस उत्पादक शेतकर्‍यांची लूट; हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी
आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजारांवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी आला आहे. शिवाय आर्थिक अडचणीमुळे शेतकरी व्यापाऱ्यांना पड्या दरात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासह ते वाढविण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
- गौतम वालदे,
उपनिबंधक वर्धा.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cotton shopping center has not been started in Wardha