बापरे... तब्बल एवढ्या लाखांच्या नकली नोटा जप्त, असा झाला भंडाफोड 

सुमित हेपट 
Wednesday, 15 July 2020

पोलिस स्टेशन मारेगाव येथे 15 जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात आरोपींना सुनावलेल्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान काही बाबींचा खुलासा झाला.

मारेगाव (जि. यवतमाळ) : येथील एका टोळक्‍याने 11 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एक लाख रुपयांचे तीन लाख देतोय तुम्ही एक लाख रुपये घेऊन या, असे सांगून दोन हजार रुपयांचा नकली नोटांचा बंडल देण्याचा बेत फसला. आपल्याला देण्यात येणाऱ्या नोटा नकली असल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांना पैसे देण्यास नकार दिला. परंतु आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून एक लाख रुपये घेऊन पोबारा केला. याबाबत संबंधिताने पोलिसांत तक्रार केल्यानंतर नकली नोटांचा प्रकार उघडकीस आला. 

पोलिस स्टेशन मारेगाव येथे 15 जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात आरोपींना सुनावलेल्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान काही बाबींचा खुलासा झाला. या प्रकरणात अटकेतील पाच आरोपींसह सत्त्यांशी हजार रुपये चलनी नोटा, तीन लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नकली नोटा जप्त केल्या. याशिवाय तीन मोटरसायकल, पाच मोबाईल आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन काठ्या असा दोन लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

 

हेही वाचा - या कॉंग्रेस नेत्यांची नवी पिढी राजकारणात सक्रिय
 

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील कर्जबाजारी व्यक्‍तीला एक लाख रुपयांचे तीन लाख रुपये सांगून मारेगाव येथील पाच जणांनी एक लाख रुपयांनी फसविले. ठरल्याप्रमाणे भद्रावती येथे एकास पाठवून मारेगाव शहर महामार्गावर पाच जणांच्या टोळक्‍याने एक लाख रुपये मागितले. यावर आधी मला तीन लाख रुपये द्या, असे म्हटल्यावर दोन हजार रुपयांचा बनावट नोटांचा बंडल दाखविला. तो बनावट असल्याचे लक्षात आल्याने टोळक्‍यांची लढवलेली शक्कल कुचकामी ठरल्याने एक लाख रुपये आमच्याकडे दे नाहीतर जीवानिशी मारून टाकू असे म्हणत फिर्यादीवर काठी उगारली आणि एक लाख रुपये घेऊन टोळक्‍यांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता. 

पोलिसांनी रात्रीच पाचही आरोपींचा शोध लावून तपासाची चक्रे फिरवली. संशयित आरोपी राजू भुजाडे, अरविंद चौघुले, अविनाश जांभुळकर, मारोती पवार, लीलाधर मुरस्कार यांनी फसवणूक केल्याने फिर्यादी महेंद्र ईश्वरलाल तिवारी यांनी मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यातील सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी कारवाई करून अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

सदर तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, पोलिस जमादार सुरेंद्र टोंगे, मनोज बडोलकर, राजू टेकाम, महेश राठोड, किशोर आडे, प्रिया निब्रड, वीणा गेडाम यांनी केला. 

संपादित : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counterfeit notes worth Rs 3 lakh seized, accused Closet