‘रब ने बनाई जोडी’ची फेसबुकवर धूम! कपल चॅलेंज’ होतेय व्हायरल

विवेक राऊत
Wednesday, 23 September 2020

कोरोनाच्या काळात मोबाईल हाच प्रत्येकासाठी जगाशी जुळून राहण्याचे माध्यम आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून जो तो सोशल माध्यमांशी जुळून राहत आहे. त्याचाच आधार घेत आज करमणुकीचे नवनवे फंडे पाहायला मिळत आहेत.

चांदूर रेल्वे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. मागील काही महिन्यांअगोदर नथीचा नखरा, पैठणी चॅलेंज असे अनेक विषय नेटकऱ्यांनी उचलून धरले होते, त्यानंतर आता ‘कपल चॅलेंज’ची फेसबुकवर धूम पाहायला मिळते आहे. कोरोनाच्या संकटातही एकमेकांवरील विश्वासाचे प्रतीक म्हणून प्रत्येक जण आपल्या जोडीदारासोबतचा फोटो फेसबुकवर व्हायरल करून हे चॅलेंज स्वीकारत आहे.

कोरोनाच्या काळात मोबाईल हाच प्रत्येकासाठी जगाशी जुळून राहण्याचे माध्यम आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून जो तो सोशल माध्यमांशी जुळून राहत आहे. त्याचाच आधार घेत आज करमणुकीचे नवनवे फंडे पाहायला मिळत आहेत. केवळ करमणूक म्हणूनच नाही तर काही काळ एकटेपणा दूर करण्यासाठीही त्याचा फायदा होतो आहे. सध्या फेसबुकवर आपल्या मित्र मंडळींना टॅग करीत अनेक जण ‘कपल चॅलेंज’ देत आहेत. मित्रही ते चॅलेंज स्वीकारत आपल्या जोडीदारासह फोटो शेअर करीत त्या चॅलेंजला उत्तर देत आहेत. लॉकडाउनच्या काळात जिथे सजणे -सवरणे कमी झाले, तिथे या चॅलेंजच्या माध्यमातून घराघरात पतिपत्नी फोटो काढण्याच्या बहाण्याने साजशृंगार करण्याचा; तसेच जुने फोटो न्याहाळण्याचा आनंद घेत असल्याचे अनेकांनी सांगितले.

कोरोना काळात अनेक नोकरदार पती-पत्नी, त्यातही आरोग्यसेवा, पोलिस, सफाई कामगार आणि इतर सर्व नोकरदारवर्ग आपल्या शासकीय जबाबदाऱ्या व सेवा देतांना आपल्या जोडीदारापासून घरापासून दूर असल्याने त्यांना एकमेकांवरील प्रेम जाहीररीत्या व्यक्त करण्याची ही संधी मिळत असल्याचे अनेकांनी सांगितले.

भावना पोहोचविण्याचे माध्यम
कोरोना संक्रमण काळात गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही दोघेही पतिपत्नी वेगवेगळ्या ठिकाणी राहून आरोग्यसेवा देत आहोत. माझी पत्नी सांगलीला मेडिकल कॉलेजला सेवा देते आहे, तर मी चांदूर रेल्वेला आहे. या विभक्त काळातही आमच्यातील स्नेह कायम आहे. आमच्यातील प्रेमात कुठेही कमतरता आलेली नाही. तर ते वाढतच असल्याचे व तुझा मला अभिमान असल्याचे तिला सांगण्याकरिता फेसबुकवरील हे ‘कपल चॅलेंज’ मला महत्त्वाचे वाटले.
डॉ. सागर वाघ, चांदूर रेल्वे

टीकाही होत आहे
आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना कोविड सोबत एकटं लढणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. हे चॅलेंज कुणी स्वीकारतांना दिसत नाही. बाकी सोशल मीडियावर सुरू असलेल्या या फालतू गोष्टी आहेत. आता सुरू केलेला सिंगल आणि कपल चॅलेंज. यात काय चॅलेंज आहे? हेच मला कळलं नाही, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियाही फेसबुकवर पाहायला मिळत आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple challange on face book