दिलासा! मृत अंकिताला लवकरच मिळणार न्याय?

रूपेश खैरी
Friday, 18 September 2020

३ फेब्रुवारी २०२० रोजी अंकिता आपल्या महाविद्यालयात जात असताना आरोपी विकेश ऊर्फ विक्‍की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात ती गंभीर भाजली. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.

वर्धा : फेब्रुवारी महिन्यातली सर्द सकाळ. सात-साडेसातची वेळ. ती आपल्या कामावर निघालेली. अचानक तो बाईकवर येतो. तिच्या अंगावर पेट्रोल ओततो. ती मदतीसाठी ओरडते. लोक धावतात. पण ती कापरासारखी पेटत जाते आणि क्षणात तिचा जळून कोळसा होतो. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारे हे अंकित पिसुड्डे जळीत प्रकरण. प्रत्येक मायबापाच्या जीवाला घोर लावणारे. आता मात्र या प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत मिळत आहेत.

कोरोनामुळे मागे पडलेले हे प्रकरण लवकरच न्यायालयात येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी (ता. १८) विशेष सरकारी वकिलांचे जिल्हा सरकारी वकिलांशी बोलणे झाल्याची चर्चा न्यायालयाच्या परिसरात होती. सदर प्रकरणाचे वकीलपत्र विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे असल्याचे यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

सोमवारपासून न्यायालयाचे कामकाज दोन पाळीत सुरू करण्याचे शासनाचे आदेश आहे. हे आदेश येताच रखडलेल्या प्रकरणांचे मार्ग मोकळे झाले आहेत. अशातच अंकिता पिसुड्डे जळीत प्रकरणातील साक्षी पुरावे सुरू करा, अशा सूचना गृह विभागाकडून आल्याने लवकरच या बहुप्रतीक्षित जळीत प्रकरणाच्या साक्षी पुराव्यावर सुनावणी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. ते कोणत्या कोर्टात चालवायचे या संदर्भात सध्या तरी काही निर्णय झाला नाही.

३ फेब्रुवारी २०२० रोजी अंकिता आपल्या महाविद्यालयात जात असताना आरोपी विकेश ऊर्फ विक्‍की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात ती गंभीर भाजली. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी घटनेच्या दिवशीच अटक केली. घडलेल्या या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी झाली. शासनाकडूनही त्याला हिरवी झेंडी मिळाली. पण, याच काळात कोरोना संसर्गाने थैमान घातले. सर्वत्र लॉकडाउन झाल्याने हे प्रकरण मागे पडले. आता न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याने या प्रकरणाच्या सुनावणीचे संकेत मिळाले आहे.

प्रकरण सध्या हिंगणघाट न्यायालयात
अंकिता जळीत प्रकरण अद्याप हिंगणघाट न्यायालयातच आहे. येथून ते वर्धा न्यायालयात येणे बाकी आहे. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे. ते प्रकरण वर्ध्यात चालविणे विशेष सरकारी वकिलांना सोयीचे होणार असल्याने ते वर्ध्यातच येईल असे काही विधीतज्ञांचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा -  प्यार दिवाना होता है! टिकटॅाकवर झाली ओळख, घेतल्या आणाभाका आणि...

आरोपीला शिक्षा होणे महत्त्वाचे
या संदर्भात महिन्याभरापूर्वी सरकारी वकिलांशी बोलणे झाले होते. त्यांनी एक महिन्यानंतर सदर प्रकरण सुरू होईल असे सांगितले होते. सध्या या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती आली नाही. शासनाने दिलेली सर्वच आश्‍वासने अद्याप बाकी आहेत. ती दुय्यम बाब असून आरोपीला शिक्षा होणे महत्त्वाचे आहे.
अरुण पीसुड्डे
अंकिताचे वडील

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The court will begin its work soon