अमर रहे अमर रहे...साश्रुनयनांनी वीरपुत्रास दिला अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

गावात ठिकठिकाणी शहीद जवान अमर रहे अशा वक्तव्याच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पार्थिव भूषण रोठे यांच्या शेतात नेण्यात आले. गावातील प्रत्येक चौकात चंद्रकांत भाकरे यांचे बॅनर व फोटो लावण्यात आले होते.

पातुर्डा (जि.बुलडाणा) : जम्मू काश्‍मिरच्या बारामुल्ला सेक्टर मधील सोपोरा येथे (ता.18) दहशतवादी हल्ल्यात संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील सीआरपीएफचे जवान चंद्रकांत भाकरे हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार (ता.२०) त्यांच्या मुळगावी पातुर्डा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सोशल डिस्टन्स ठेऊन नागरिकांनी उपस्थिती लावत साश्रुनयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला.

बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भाकरे यांनी लहान पासूनच देशाची सेवा करायची अशी गाठ बांधली होती. भाकरे यांनी 1999 ला पातुर्डा येथील जिल्हा परिषद शाळेत 12 पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांना सन 2004 मध्ये सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी मिळाली. ते मागील तीन महिन्यांपूर्वी गावात सुट्टीमध्ये आले होते. सध्या ते कॉन्स्टेबल या पदावर होते व त्यांचे प्रमोशन हेड कॉन्स्टेबल या पदावर झाले होते. ते प्रमोशनच्या ट्रेनिंग करिता जाणार होते. प्रमोशनमधील एक बॅच पुढे गेली होती व दुसरी जाणार होती. परंतु कोरोना आल्यामुळे त्यांना तिथेच थांबविण्यात आले होते. त्यांना पुणेच्या सेंटरवरून श्रीनगरला पाठविले होते. गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चंद्रकांत भाकरे हे शहीद झाले. यापूर्वी 1987 ला याच गावातील एक जवान शहीद झाला होता. 

आवश्‍यक वाचा - बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोनामुक्त

त्यामुळे आता पातुर्डा हे गाव शहिदांचे गाव म्हणून ओळखल्या जात आहे. त्यांच्या पश्‍चात आई, बाबा, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठे बाबा, काका असा मोठा आप्त परिवार आहे. शहीद भाकरे यांच्या पार्थिवाला श्रीनगरला सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तेथून (ता.19) दुपारी अडीच वाजता स्पेशल विमानाने दिल्ली व तेथून नागपूर नंतर शेगावला रात्री आले. (ता.20) सकाळी 7 वाजता त्यांचे पार्थिव पातुर्डा या त्यांच्या मुळगावी पोहोचले. त्यापूर्वी येथील स्थानिक प्राशसनाने अंत्यसंस्काराच्या जागेची पाहणी केली. लॉकडाउन असल्यानंतरही गर्दी होण्याची शक्यता पाहता सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे याकरिता प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती.

हेही वाचा - अरे वा! पुष्पवर्षाव करत केला सफाई कामगारांचा सत्कार

येथे आरपीएफची एक बटालियन बोलावण्यात आली. गावातील युवकांनी संपूर्ण गाव स्वच्छ केले. गावात प्रत्येक घरी जाऊन फुलाची टोकरी देण्यात आली. संपूर्ण गावातून पार्थिव फिरणार अशी व्यवस्था करावी अशा सूचना आमदार डॉ. संजय कुटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्या प्रमाणे शहीद जवान भाकरे यांचे पार्थिव आल्याबरोबर त्यांना तिथे सीआरपीएफकडून सलामी देण्यात आली. अर्ध्या तासात सर्व क्रिया आटोपून गावातून पार्थिव फिरविण्यात आले. यापूर्वी पार्थिवासोबत कोणी न येता आहे तेथूनच श्रद्धांजली वाहावी असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ व आमदार डॉ संजय कुटे यांनी जनतेला आवाहन केले. 

गावात ठिकठिकाणी शहीद जवान अमर रहे अशा वक्तव्याच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पार्थिव भूषण रोठे यांच्या शेतात नेण्यात आले. गावातील प्रत्येक चौकात चंद्रकांत भाकरे यांचे बॅनर व फोटो लावण्यात आले होते. गावातील नागरिकांनी जवानाच्या पार्थिवावर घरांवरून पुष्पवृष्टी केली. यावेळी सर्व गावातील नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे, चंद्रकांत भाकरे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. श्रद्धांजली देण्याकरिता पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ, एसडीओ वैशाली देवकर, तहसीलदार समाधान राठोड, बीडीओ बी. डब्लू. चव्हाण, सूर्यकांत सोनटके, पातुर्डा सरपंच शैलजाताई भोंगळ, एसपी महेश्वरी डीजीसी आरपीएफ, संजय लाटकर, संजय कुमार यांनी पुष्पचक्रद्वारे श्रद्धांजली वाहिली. 

जवानाच्या पार्थिवाला सीआरपीएफ बटालियनकडून तीन वेळा गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. अंतिम दर्शन शहीद जवानाचे आई-वडिल, मोठे वडिल, काका, तीन भाऊ, पत्नी, मुलं काव्या व कुश यांनी दर्शन घेतले. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पार्थिवाला शहीद चंद्रकांत यांचे भाऊ तुषार व जयंत यांनी मुखाग्नी दिला. शासकिय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी अधिकारी वर्ग व डीवायएसपी प्रिया ढाकणे, हेमराजसिंग राजपूत, ठाणेदार भूषण गावंडे, सोनाळा ठाणेदार अमर चोरे, श्रीकांत विखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर वाढे व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. आरपीएफ व सीआरपीएफची बटालियन, होमगार्ड, लोकप्रतिनिधी, पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

ते शेतकरी कुटुंबातील
शहीद भाकरे यांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. दोन्हीही भाऊ शेती हा व्यवसाय करतात. शहीद चंद्रकांत भाकरे यांना गावात बंटी या टोपण नावाने ओळखले जात असे. सुट्टी मिळाली व घरी आले की, ते प्रथम मातेची सेवा करत व सुट्टीवर काळ्या मातीची म्हणजेच शेतीची सेवा सोबतच त्यांच्या घरी असलेले ट्रॅक्टर पण चालवत असे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cremation in buldana on the brave son