esakal | या जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्या 55 जणांवर गुन्हे; फौजदारी कारवाईचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

corona (2).jpg

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशीम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत तेथील पोलिस उपायुक्त अथवा पोलिस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्या 55 जणांवर गुन्हे; फौजदारी कारवाईचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 55 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यापुढेही जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशीम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत तेथील पोलिस उपायुक्त अथवा पोलिस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

आवश्यक वाचा - अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला 'मुळशी पॅटर्न'

तसेच रीतसर परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विना परवानगी दाखल झालेल्या 55 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील 30, मानोरा तालुक्यातील 11, रिसोड तालुक्यातील 03, मालेगाव तालुक्यातील 08 व कारंजा तालुक्यातील 03 व्यक्तींचा समावेश आहे.

‘होम क्वारंटाईन’आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होणार
मुंबई, पुणे व इतर महानगरे, बाहेर जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात यापूर्वी परतलेल्या नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के मारून त्यांना घरीच अलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ग्रामीण व शहरी भागातही काही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करून खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे ‘होम क्वारंटाईन’च्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. महसूल, पोलिस व ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना असे गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण आढळून आला आहे. मात्र, यापुढील काळात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. संचारबंदी, जिल्हाबंदी, तसेच ‘होम क्वारंटाईन’ विषयक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले आहेत.