
चितळाच्या कातडीसह तिघांना अटक; तुमसर येथे वन विभागाची कारवाई
तुमसर : वन्यजीवांची शिकार आणि त्यांच्या अवयवांचा बाजार जिल्ह्यात गुप्तपणे सुरू असतो. वन विभागाने याबाबत मिळालेल्या माहितीचा आधार घेत सापळा रचून चितळाच्या कातड्यासह तिघांना अटक केली. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रहांगडाले यांनी दिली. यात राजेश अजाबराव डहाके (रा. पांजरा), सचिन मोहन कामथे, लंकेश दशरथ मस्के (दोघेही रा. शहर वॉर्ड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
तुमसर वन विभागाला घटनेच्या दिवशी मिळालेल्या माहितीतून इंदिरा वॉर्डातील दुचाकी दुरुस्ती दुकानातून अवैध कारवाया होत असल्याचा सुगावा लागला. त्यानंतर दुचाकी दुरुस्तीचा बहाणा करून अधिकाऱ्यांनी आरोपींचे दुकान गाठले. दुकान मालक आरोपी राजेश डहाके याला फोन वरून बोलावण्यात आले. तो येताच वन अधिकारी यांनी कारवाई करून वयस्क चितळाचे कातडे दुकानातून ताब्यात घेतले. वन्यजीव प्रतिबंध कायद्यानुसार तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले, फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. टी. मेंढे, वनपाल टी. एच घुले, डेव्हिडकुमार मेश्राम, कविता केंद्रे, प्रफुल्ल खोब्रागडे, चालक खंडागळे, क्षेत्र सहायक अस्लम शेख, के. एन मस्के, ए. एन.धुर्वे, ओ. एन. मोरे, अमोल ठवकर, के. बी. भुरे, दिनेश शेंडे यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी दुकान मालक डहाके याने वन विभागाला दिलेल्या बयाणानुसार त्याला अज्ञात व्यक्तीने कातडे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे तस्करी करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. दुकानदाराला कातडे देणाऱ्या व्यक्तीच्या शोधत पथक रवाना झाले आहे. कारवाईत दुकानात काम करणाऱ्या मजुरांना देखील ताब्यात घेतले आहे. सचिन मोहन कामथे, लंकेश मस्के यांनी कारवाईनंतर घटनास्थळीच हंबरडा फोडला. मालक काय करतो याकडे लक्ष दिले नाही. आम्ही गाडी दुरुस्ती करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वन विभागाने दोघांना सह आरोपी केले आहे.
चितळ तीन वर्षांचे
वन विभागाने जप्त केलेले कातडे तीन वर्षाच्या वयस्क चितळाचे असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यात दगडी मीठ आणि रासायनिक प्रक्रिया करून जतन केलेले कातडे जुने आहे. नवीन कातड्याला मोड पडत नाही. मात्र, या कातड्यावर मोड असून कुजल्यामुळे एक छिद्रही पडले आहे.