ऐकावे ते नवलच! गुंडाने भररस्त्यात पोलिसालाच बदडले

सुरज पाटील
Friday, 28 August 2020

यवतमाळ येथील बाजोरियानगरलगतच्या विदर्भ हाउसिंग सोसायटीत वर्दीवर असलेल्या एका मद्यपी पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाने भररस्त्यात पोलिसाला बदडले आणि रस्त्यावर लोळवून धिंगाणा घातला. पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले

यवतमाळ : एका दारूतस्कराने पोलिस कर्मचाऱ्याला भररस्त्यात लाथाबुक्‍क्‍यांचा प्रसाद देत खाकीचे धिंडवडे काढल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी त्या वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यास निलंबित केले. निलंबनाचे आदेश गुरुवारी (ता.२७) सायंकाळी काढले.

अनुप करमणकर असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर कर्मचारी पोलिस मुख्यालयात संलग्नित होता. यवतमाळ येथील बाजोरियानगरलगतच्या विदर्भ हाउसिंग सोसायटीत वर्दीवर असलेल्या एका मद्यपी पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाने भररस्त्यात पोलिसाला बदडले आणि रस्त्यावर लोळवून धिंगाणा घातला. पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हा खळबळजनक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला होता. काही दिवसांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

यापूर्वी घाटंजीमध्ये त्या पोलिसाची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने त्याला मुख्यालयात जोडले होते. मात्र, येथेही त्याने गावगुंडासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. एका गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आलेल्या गुंडाने विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात पोलिसावरच हात साफ केला. मारहाण होऊनदेखील पोलिस ठाण्यात साधी तक्रार नोंदविली गेली नव्हती. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी वादग्रस्त कर्मचाऱ्यास निलंबित केले.

अधिक माहितीसाठी - पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी नाराज! काय आहे नेमका बदल्यांचा ‘पेच’

शिस्तप्रिय खात्यात अशोभनीय वर्तन
यवतमाळ येथे तात्पुरते कारागृह स्थापन करण्यात आले आहे. बंदीच्या स्वॅब नमुन्यांचे परीक्षण करण्याच्या कामी पोलिस कर्मचाऱ्याची ड्यूटी लावण्यात आली होती. गेल्या १९ ऑगस्ट रोजी हा पोलिस गार्ड इन्चार्ज यांना कोणतीही सूचना न देता गैरहजर राहिला. त्याने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसोबत वाद घातला. सदर वर्तन शिस्तप्रिय पोलिस खात्यासाठी अशोभनीय आहे. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The criminal beat the police