esakal | मिनी लॉकडाउन जाहीर होताच तळीरामांची दारूच्या दुकानात गर्दी, तर निर्बंधांमुळे व्यापारी संघटना संतापल्या
sakal

बोलून बातमी शोधा

crowd at liquor shop due to mini lockdown announcement in amravati

लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर मद्याच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी दिसून आली. अनेकांनी लाकडाउनमध्ये पुरेल इतका स्टॉक करून घेतला. 

मिनी लॉकडाउन जाहीर होताच तळीरामांची दारूच्या दुकानात गर्दी, तर निर्बंधांमुळे व्यापारी संघटना संतापल्या

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून मुख्यमंत्र्यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. अमरावती जिल्ह्यातसुद्धा शासनाच्या आदेशाप्रमाणे मिनी लॉकडाउन राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज (ता.पाच) स्पष्ट केले. त्या अनुषंगाने किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्‍यक वस्तू सोडून सर्व प्रकारची दुकाने व मॉल्स बंद राहणार आहेत. सोमवारी सायंकाळपासूनच 30 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार 144 कलम लागू करण्यात  आले असून सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत जमावबंदी, तर रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय तसेच अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना...

विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रित असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सुरुवातीला 700 ते 800 च्या संख्येने येणारे रुग्ण मागील काही दिवसांत कमी झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाला काहीसा  दिलासा मिळाला. मात्र, असे असले तरी शासनाच्या आदेशाने अमरावतीमध्ये सुद्धा निर्बंध लागणार आहेत. यापूर्वी स्थानिक स्तरावर प्रशासनाकडून 15 दिवसांचे लॉकडाउन करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णसंख्या कमी होण्यास चांगलीच मदत झाली होती. आता पुन्हा एकदा नव्याने अमरावतीकर निर्बंधांना सामोरे जाणार आहे. 

विकेंड लॉकडाउनची सवय -
यापूर्वीसुद्धा रुग्णसंख्या वाढल्यानंतर अमरावतीमध्ये शनिवार ते सोमवारी सकाळपर्यंत असा 72 तासांचा साप्ताहिक लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अमरावतीकरांसाठी विकेंड लॉकडाउन नवीन राहिलेला नाही.

तळीरामांची घाईगर्दी -  
लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर मद्याच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी दिसून आली. अनेकांनी लाकडाउनमध्ये पुरेल इतका स्टॉक करून घेतला. 

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

आर्थिक संकटाची भीती -
अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने अशा पद्धतीने लॉकडाउन लावणे योग्य नसल्याचे सांगून व्यापारी संघटनांनी या लॉकडाउनचा विरोध केला आहे. प्रशासनाने आतापर्यंत सांगितलेल्या सर्वच नियमांचे पालन आम्ही केले आहे व करीत आहोत. लॉकडाउनमुळे प्रचंड आर्थिक संकट येईल, त्यामुळे शासन व प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. 

एका आठवड्यातील रुग्ण 

  • 29 मार्च  - 241
  • 30 मार्च  - 108
  • 31 मार्च - 259
  • 1 एप्रिल - 288
  • 2 एप्रिल - 275
  • 3 एप्रिल - 325
  • 4 एप्रिल - 303
  • 5 एप्रिल - 241
     
loading image