वाघाच्या बछड्याने लावली "सोशल डिस्टन्सिंग'ची वाट, कसे ते वाचाच?

crowd while rescue operation of cub
crowd while rescue operation of cub

मूल (जि. चंद्रपूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता पसरली असताना जंगलातील वन्यजीवांना भटकंतीसाठी मात्र रान मोकळे झाले आहे. याची प्रचिती शुक्रवारी, 24 एप्रिल रोजी सकाळी मूल तालुक्‍यातील सुशी येथे आली. आईपासून भटकलेल्या एका वाघाच्या बछड्याला गावाशेजारी असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्याजवळ गावकऱ्यांनी बघितले आणि एकच गर्दी उसळली. त्यामुळे वाघाच्या बछड्याने सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडवला.

चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर विभागातील सुशी येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास गावातील अजय शेंडे यांच्या घराजवळील तणसाच्या ढिगाऱ्याजवळ काही जणांना वाघाचा बछड्या दिसला. याची माहिती गावात पोहोचली आणि बघ्यांची एकच गर्दी उसळली. हजाराच्यावर महिला-पुरुष बछड्याला बघण्यासाठी तेथे एकत्र आले. टाळेबंदी आणि "सोशल डिस्टन्सिंग'चा मात्र यानिमित्ताने चांगलाच बोजवारा उडाला.
गावकऱ्यांनी वनविभागाला या घटनेची माहिती दिली. तणसाच्या ढिगाऱ्याजवळ बछडा निवांत बसून होता. घटनास्थळी उपस्थित असलेले वनाधिकारी सोनकुसरे यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. बछड्याला पकडण्याची परवानगी दिली. त्यानंतर वाघाच्या बछड्याला सुखरूपपणे पकडण्यात आले.

बछडा अंदाजे तीन ते चार महिन्यांचा आहे. पाण्याच्या शोधात असताना कदाचित तो पहाटेच आईपासून भटकला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. गावाशेजारी आल्यानंतर कुत्रे त्यांच्या मागे लागले. त्यामुळे तो तणसाच्या ढिगाऱ्याजवळ लपला असावा, असा तर्क लावला जात आहे. बछडा सुखरूप आणि सुरक्षित असून त्याला चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्रात नेण्यात आले आहे. बछडा दुरावल्याने वाघीण चवताळू शकते. त्यामुळे मानवावर हल्ले होऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर आता वाघिणीचा शोध वनविभागाने सुरू केला आहे. गावाशेजारी वनकर्मचाऱ्यांची गस्त ठेवण्यात येणार आहे.

वन्यजीव गावाशेजारी

वैशाख वनव्याला सुरुवात होत असल्याने उन्हाची काहिली जाणवायला लागली आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा परिणाम वन्यजीवांवर होत आहे. पाण्याच्या शोधात प्राणी गावाशेजारी येऊ लागले आहेत. एकीकडे देशात कोरोना विषाणूचा थैमान सुरू असताना संसर्ग टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मानव घरात लॉकडाऊन आहेत. दुसरीकडे वन्यजीव मात्र याच मानवाच्या लॉकडाउनचा फायदा उठवीत असताना दिसत आहे. ग्रामीण भागात मोहफुले वेचणीसाठी आणि सरपणासाठी वनात जाण्याचे प्रमाण काहीसे कमी आहे. रानावनात चहलपहल नसल्याने वन्यप्राणी मनसोक्त फिरत आहेत. नुकतेच दोन दिवसांआधी तालुक्‍यातील राजगड येथे शेतशिवारात मगर आढळून आली होती. आता सुशी येथे वाघाचा बछडा आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com