esakal | सांस्कृतिक उदासीनतेचा इतिहास ग्रंथरूपात!
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

सांस्कृतिक उदासीनतेचा इतिहास ग्रंथरूपात!

sakal_logo
By
नितीन नायगावकर

सांस्कृतिक उदासीनतेचा इतिहास ग्रंथरूपात!
नागपूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची ओळख भलेही साहित्यिक म्हणून असेल. पण, तीन दशकांत राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रिपद भूषविणाऱ्या राजकीय मंडळींना "फॉलोअप मॅन' अशीच ओळख आहे. पहिल्या पत्रात जाणीव करून द्यायची आणि त्यानंतर दहा-वीस वर्षे आठवण करून देणारी पत्रं सरकारला पाठवायची. दुर्दैवाने बोटावर मोजण्याएवढ्या गोष्टी सोडल्या तर तीन दशकांत सरकारी उदासीनताच अधिक अनुभवायला मिळाली. या उदासीनतेचाच इतिहास त्यांनी आता ग्रंथरूपात आणलाय.
"सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष' या शीर्षकाचे डॉ. जोशी यांचे नवे पुस्तक संदर्भांसाठी कायम आपल्या जवळ ठेवावे असेच आहे. प्रशासकीय व राजकीय यंत्रणेने विदर्भाचा तसेच उर्वरित ग्रामीण महाराष्ट्राचा सांस्कृतिक अनुशेष प्रत्येक सरकारने किती प्रामाणिकपणे जपला, याचेही दाखले या पुस्तकाच्या रूपाने संग्रही राहतील.
"सांस्कृतिक धोरण' या विषयाशी संबंधित राज्यपाल, मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी आदींसोबत त्यांनी केलेला पत्रव्यवहार या पुस्तकाचा आत्मा आहे. तीन दशकांत मुख्यमंत्री व मंत्री बदलले. काहीवेळा सत्ताबदलही झाला. परंतु, 1997 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांना पाठविलेल्या पत्रात मराठी विद्यापीठासारखे अनेक प्रश्‍न जसे ठळकपणे मांडले होते, आजही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रव्यवहार करताना याच प्रश्‍नांवर चर्चा होत आहे, ही शोकांतिका या पुस्तकातून वाचायला मिळते.
विशेष म्हणजे यातील काही बाबींवर सरकारने जेव्हा जेव्हा सकारात्मक पावले उचलली, तेव्हा त्यांचे अभिनंदन करणारे लेखही या पुस्तकात आहेत. विदर्भाच्या वाट्याला आलेला सांस्कृतिक अनुशेष नयन बाराहाते यांनी मुखपृष्ठाद्वारे अतिशय सुरेख दर्शविला आहे. ऑक्‍टोबरमध्ये या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.
संघर्षात शहीद झालेल्यांना...
पुस्तकाची अर्पण पत्रिका डॉ. जोशी यांच्या स्वभावाला अगदी साजेशी आहे. "संस्कृतीचे सांस्कृतिकत्व टिकवण्याच्या संघर्षात शहीद झालेल्यांना...' हे अर्पणपत्रिकेतील शब्द पुस्तकात शिरण्यास भाग पाडतात. विदर्भाचे सांस्कृतिक योगदान, अनुशेष, वेळोवेळी झालेला सांस्कृतिक अन्याय या साऱ्या मुद्यांवरील लेखही पुस्तकात आहेत.

"संस्कृती' हा काही राजकीय पक्ष नाही. तो लोकपक्ष आहे. अशी सांस्कृतिक जागृती नसणेदेखील सांस्कृतिक अनुशेष वाढता असण्याचे कारण आहे. तो दूर करण्याचे मार्गही पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केलाय.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी,
अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

loading image
go to top