
चिखलदरामध्ये थंड वातावरण असल्याने येथे स्ट्रॉबेरी, कॉफीचे उत्पादन घेतले जात आहे. हे वातावरण सफरचंदाला पोषक असल्याने नजीकच्या काळात पर्यटकांची सलादपासून विविधांगी ज्यूसची मेजवानी मिळणार आहे.
मेळघाट ( जि. अमरावती ) : मेळघाट सर्वदूर व्याघ्र प्रकल्पासाठी परिचित आहे. त्यामुळेच येथील पर्यटनाला चालना मिळत आहे. आता इथे येणारा पर्यटक रिकाम्या हाती परत जाणार नाही. कारण आता खवा, दही, रबडी, स्ट्रॉबेरीसह जंगलातील रानभाजी व फळांची चव केवळ गावापुरती मर्यादित राहणार नसून 'लोकल टू ग्लोबल' होणार आहे.
चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ हे सध्या जंगलातील हिरवळीवर बसून गावागावांतील तरुणांच्या सभा घेत आहेत. वर्ग एकचा अधिकारी आपल्यासोबत बसून आपल्याला आपल्या समृद्ध गावाचे स्वप्न दाखवत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत आहे. गावातील व परिसरातील सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संपर्क करून विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांना करीत आहेत. तालुक्यातील माथा ते पायथा, असे 100 टक्के गावांशी संपर्क करून पाणलोट नियोजन, शिवारफेरी आदींबाबत जनजागृती सुरू आहे. चिखलदरामध्ये थंड वातावरण असल्याने येथे स्ट्रॉबेरी, कॉफीचे उत्पादन घेतले जात आहे. हे वातावरण सफरचंदाला पोषक असल्याने नजीकच्या काळात पर्यटकांची सलादपासून विविधांगी ज्यूसची मेजवानी मिळणार आहे. अनेक गावांतील नागरिकांना सामूहिक वनहक्कअंतर्गत वनपट्टे मिळाले असून यामधून मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव तेंदूपत्ता, बांबू, लाख, मध, डिंक, आवळा आदी अनेक माध्यमातून अर्थार्जन करीत आहेत.
हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल
स्वप्नांना मिळणार बळ -
समृद्ध गावकरी किंवा गावाचे व्हिडिओ दाखवून तरुणांना प्रेरित केले जाते. तेथे शक्य झाले, तर येथे पण आपण शक्य करू. स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिली तर मी समृद्ध होणार व प्रत्येक व्यक्ती समृद्ध झाल्यावर गाव समृद्ध होणार असल्याने शासकीय यंत्रणा या स्वप्नांना बळ पुरविणार आहे.
हेही वाचा - श्वास रोखून सुरेशने काढले पुरात विहिरीत बुडालेले...
प्रत्येक गाव समृद्ध होणार -
मेळघाटातील दही, रबडी, खवा केवळ स्थानिक गावापुरता मर्यादित न राहता त्याचे ग्लोबल मार्केटिंग केले जाणार आहे. त्यामुळे बचतगटासह गावकरी समृद्ध होणार आहेत. राहू प्रमाणे इतरही गावात बांबूनिर्मिती व वस्तूंना चालना देणार असून यासाठी ग्रामसभा घेत असल्याचे चिखलदऱ्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.