सायकलने दिली लताच्या जीवनाला गती

सुषमा सावरकर
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नागपूर : आयुष्यात कुणाचेही मार्गदर्शन नसताना स्वःकष्ट, मेहनतीने आज त्यांचे स्वत:च्या मालकीचे घर आहे. सायकलच्या दोन चाकांसोबत त्यांचीही सतत भ्रमंती सुरू असते. सकाळी आठ ते रात्री आठ असा त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू असतो. झोपडपट्टीत मोलमजुरी, शिक्षण आणि त्यानंतर विवाहानंतरही आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना ध्येयाने तोंड देत न डगमगता स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या लता खैरकर खरोखर आदर्श आहेत.

कळमेश्‍वर येथे वास्तव्यास असलेल्या लता अरुण खैरकर (वय 45) यांचे शिक्षण जेमतेम दहावीच. नागपुरातील दाभा झोपडीत राहून त्या मोठ्या झाल्या. माहेरी मोलमजुरी करून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1994 मध्ये त्यांचा विवाह अरुण खैरकर यांच्याशी झाला. पती ऑटोमोबाईल कंपनीत नोकरीवर होते. कुटुंबाला हातभार म्हणून लग्नानंतर त्यांनी कपड्यांच्या दुकानात नोकरी करण्यास सुरुवात केली. एकत्र कुटुंबात लता यांचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, नियतीला हे मंजूर नव्हते म्हणून की काय, लग्नाच्या तीन वर्षांतच पती अरुण यांचा ब्रेन हॅमरने मृत्यू झाला. त्यानंतर वर्षभरातच सासू, सासरे, दीर यांचाही आधार हरपला. घरात कमावते कुणीही नसल्याने वर्षभराच्या बाळाचा सांभाळ करीत लताने कपड्याच्या दुकानात नोकरी सुरू केली. अतिशय अल्प वेतनात घराचा गाडा चालविणे कठीण होते. स्वत:चा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने त्यांनी नागपूर सोडून कळमेश्‍वर गाठले. पै पै जमवून सायकल खरेदी केली आणि त्यांचे चालते फिरते दुकान सुरू झाले.
दररोज सकाळी आठ ते रात्री आठ असा त्यांचा व्यवसायाचा दिनक्रम असतो. थंडी, ऊन, वारा, पाऊस कशाचाही त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत नाही. सायकलवरून गाडीवर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला असता; अपघात झाल्याने पुन्हा सायकल स्वीकारली. अठरा वर्षांपासून त्यांच्या सायकलची दोन चाके आणि लता सतत कार्यरत, गतिशील दिसतात. आज स्वकष्टातून त्यांनी मुलाचे बीबीएपर्यंतचे शिक्षण व स्वः मालकीचे घर या दोन गोष्टी पूर्ण केल्या. मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली आहे.
जीवनात अनेक उतार चढाव येतात. परंतु, न डगमगता त्यांचा सामना करणे आणि आलेल्या संकटांना ध्येयाने पुढे जाणे गरजेचे असते. मुलींनी शिक्षण घेऊन, स्वबळावर उभं राहणे ही काळाची गरज आहे.
लता अरुण खैरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cycle accelerates Lata's life