
प्रणाली हिला संवादाकरिता दीपावली व थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने आमंत्रित केले होते. अवघ्या २१ वर्षाच्या तरुणीचे हे धाडस बघून गावातील महिला-पुरुष व तरुणाई मोठ्या प्रमाणात तिच्या स्वागतासाठी आले.
वर्धा : ‘आवरा प्रदूषणाला, जपा पर्यावरणाला, सावरा स्वतःला’ असा समाजाला संदेश देत प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे या २१ वर्षीय तरुणीने पर्यावरणपूरक शून्य बजेट सायकल चालवत प्रवास सुरू केला आहे. पुनवट (ता. वणी, जि. यवतमाळ) येथून एकटीने हा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेत केलेल्या प्रवासात ती तरुणाईची प्रेरणा ठरली आहे.
या प्रवासात लोकांना पर्यावरण बचावाचा संदेश देत पुनवट ते चंद्रपूर, चंद्रपूर ते सेवाग्राम-वर्धा, वर्धा ते देवळी-बोपापूर (दिघी) असा तिचा ३५० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण झाला. पुढील काळात विदर्भ-महाराष्ट्र स्तरावर सायकलने पर्यावरणाचा संदेश देण्याचा मनस्वी निर्णय घेऊन निघालेली ही तरुणी बोपापूर-देवळी भागात पोहोचली.
माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या वाचन संस्कृती चळवळीच्या माध्यमातून युवा पिढीला वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी संस्थेचे गत पाच वर्षांपासून कार्य सुरू आहे. ‘पुस्तक आपल्या दारी, चालते-फिरते वाचनालय’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात संस्थेचा संविधान पुस्तक वाचन उपक्रम व वाचक संवाद कार्यक्रम, असा वाचना प्रती आवड निर्माण करणारी मोहीम सुरू आहे.
या मोहिमेत फेसबुक या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाचन संस्कृती चळवळ-वर्धा असे पेज तयार करण्यात आले आहे. प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांद्वारा संविधान या पुस्तकाचे अर्धा तास वाचन केले जाते. रविवारी बुद्धिवान, तज्ज्ञ वक्त्यांकडून संवाद साधला जातो. ही प्रक्रिया नियमित सुरू असताना ११ मालिकेच्या फेसबुक संवादाकरिता तीन सायकल यात्रा सुरू केली आहे.
प्रणाली हिला संवादाकरिता दीपावली व थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने आमंत्रित केले होते. अवघ्या २१ वर्षाच्या तरुणीचे हे धाडस बघून गावातील महिला-पुरुष व तरुणाई मोठ्या प्रमाणात तिच्या स्वागतासाठी आले.
लोकसंवादानंतर तिचे माध्यम साक्षरता संस्थेच्या वतीने पुरुष मंडळीने तिचा संविधान पुस्तक देऊन सत्कार केला. महिला मंडळीने तिचा शाल देऊन गौरव केला व गावातील तरुणाईने तिला आभारपत्र देऊन सन्मानित केले. गावातील युवकांनी तिला लोकवर्गणी करून मदतीचा हात पुढे केला तर स्वाभिमानी वृत्तीने तिने गोळा झालेली वर्गणी वाचन संस्कृती चळवळीला समर्पित केली. थोर, महामानव व राष्ट्रसंतांच्या लोकप्रबोधनाचा वारसा पुढे चालवत ती एकटीच सायकलने निघाली. तिचे हेच धाडस अवघ्या तरुणाईला प्रेरणास्रोत ठरत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे