धरण आटले, पाणी पेटले

सतीश घारड
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

टेकाडी - मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस होण्याचे भाकीत करण्यात आले. परंतु, जून व जुलै महिना लोटल्यावरही चांगला पाऊस न पडल्याने सोयाबीन उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशात शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आल्याचे चित्र दिसून येत आहे.

टेकाडी - मागील वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस होण्याचे भाकीत करण्यात आले. परंतु, जून व जुलै महिना लोटल्यावरही चांगला पाऊस न पडल्याने सोयाबीन उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशात शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट आल्याचे चित्र दिसून येत आहे.

खरीप हंगामाचे दोन महिने लोटले आहेत. काही शेतकऱ्यांनी पऱ्हे लागवड केली आहे. परंतु, पावसाने डोळे वटारल्याने क्षेत्रातील शेतकऱ्यांनी धरणांच्या पाण्याकडे डोळे रोखले आहे. परंतु, तोतलाडोह धरणात केवळ २१.७७ टक्‍के पाणी शिल्लक आहे. क्षेत्रातील तिन्ही धरणांपैकी तोतलाडोह धरणाला महत्त्वाचे मानले जाते. ज्याला संकटकाळी दोन महिन्यांच्या पाणीसाठा शिल्लक ठेवण्याच्या दृष्टीने राखीव म्हणूनच गणले जाते. चौराई धरणातदेखील ६४.०८ टक्‍के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांवर पडले आहे.

सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये हवा तितका पाऊस होत नाही. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पावसावरच क्षेत्र अवलंबून असते. त्यातही जलसाठ्याची पातळी अद्याप अर्ध्यावर न गेल्याने भारी जलसंकट असल्याचे दिसून येत आहे. धरणांचा पाणीसाठा सरासरी २७ टक्‍के इतकाच आहे. धरणांशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. परंतु, महत्त्वाच्या तिन्ही जलसाठ्यांमध्ये पुरेपूर पाणी नसल्याने संबंधित प्रशासन व राज्य सरकार कुठला मार्ग काढते, याकडे लक्ष लागले आहे.

उपलब्ध जलसाठा
धरण          जलसाठा 
                (टक्‍क्‍यात)

तोतलाडोह    २१.७७
पेंच              ६७.८२
खिंडसी         ३४.३५
चौराई          ६४.०८

सध्या धरणांमधून पाणी सोडण्याची स्थिती नाही. यंदा ६०० ते ८०० एमएम पाऊस झाला. खूपच कमी पाऊस झाल्याने समस्या उद्‌भवलेली आहे. पिकांसाठी पाणी सोडले तर ऑक्‍टोबरमध्ये जलसाठा उपलब्ध होणार नाही. पिण्याच्या पाण्याचादेखील प्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्‍यता आहे. पिण्याचे पाणी आणि बिगर सिंचनाइतकाही टक्का वाढलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक आहे. त्यानंतर बघू काय निष्कर्ष निघतो.
- जितेंद्र तुरखेडे, कार्यकारी अभियंता, पेंच प्रकल्प.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dam water storage