झाडांमुळे अंबाझरीला धोका

झाडांमुळे अंबाझरीला धोका
नागपूर : शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे क्षेत्र असलेले अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. त्यातच धरणालगत असलेल्या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. येथील 304 झाडे पंधरा दिवसांत तोडण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आज सभागृहात दिले.
मनपाच्या सभेत प्रश्‍नोत्तरादरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल गुडधे यांनी अंबाझरी तलावाच्या धरणाची भिंत सुरक्षित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, अंबाझरी धरणाचे आयुष्य संपले आहे. धरणासाठी 10 कोटींच्या खर्चासंदर्भात जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला. धरणाच्या कामासाठी कुठल्याही प्रकारचा विलंब लागू नये, धरण फुटीचा प्रसंगही शहरावर ओढवू नये. त्यासाठी महापालिकेला आतापासूनच कामाला लागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांनी धरण मजबूत करण्याची गरज व्यक्त करीत पाच कोटी मेट्रो प्रशासनाला मागण्यात आल्याची माहिती दिली. यातील एक कोटी रुपये जमा केले आहे. हे कामदेखील मेट्रो करणार आहे. 2016 मध्ये धरणाचे ऑडिट झाले होते. तेव्हापासून महापालिका वृक्षतोडीपेक्षा निविदा प्रक्रियाच राबवत आहे. पालिकेच्या निविदेला कुणीही प्रतिसाद देत नसल्याने अद्याप वृक्षकटाई झाली नाही. प्रशासनाच्या उत्तरावर माजी महापौर प्रवीण दटके यांनी महापालिकेकडे कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही का? नाही कंत्राटदार मिळाला तर कामच करायचे नाही काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर महापौर नंदा जिचकार यांनी महापालिकेची यंत्रणा राबवून येत्या पंधरा दिवसात 304 वृक्ष कापण्याचे निर्देश दिले.
नासुप्रच्या जमीन आरक्षणाला देणार स्थगिती
शासनाने नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा निर्णय घेतला असला तरी, यासंदर्भातील अधिसूचना काढली नाही. त्यामुळे शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नियोजन प्राधिकर नागपूर सुधार प्रन्यासकडे आहे. शासनाच्या अधिसूचनेनंतर नियोजन प्राधिकार महानगरपालिका असणार असल्याने 1 एप्रिल 2018 पासूनचे नासुप्रने घेतलेले आरक्षण (रिझर्व्हेशन) संदर्भातील निर्णय स्थगित ठेवण्यात येईल. महापौर नंदा जिचकार यांनी सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या याबाबतच्या सूचनेला मंजुरी दिली. या चर्चेत प्रवीण दटके, कॉंग्रेस सदस्य पुरुषोत्तम हजारे यांनी भाग घेतला.
"जलप्रदाय'वर भडकल्या आभा पांडे
जलवाहिनी गळतीसाठी वारंवार पाणी बंद ठेवण्यात येते. गळतीत किती पाणी वाहून गेले याचा कुठलाही डाटा नाही. कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही पाणीपुरवठा होत नाही. कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या खंडित वीजपुरवठ्याच्या नोंदीत तफावत असल्याचा आरोप करीत नगरसेविका आभा पांडे यांनी जलप्रदाय विभागावर संताप व्यक्त केला. त्यावर महापौरांनी गळतीच्या पाण्याचा डाटा तयार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com