देवी रेणुकेचा माहूरगड देतोय प्राणवायूचे धडे, ड्रोनने टिपले हिरवे लेणे

दिनकर गुल्हाने
Sunday, 18 October 2020

माहूरगडाचे हिरवाईचे लेणे म्हणजे प्राणवायूच्या जणू लहरी. हाच वनराईतून मिळणारा प्राणवायू मनाला तजेला भरतो. देवीवरचा प्रचंड विश्वास हा भाविकांच्या प्रत्येक श्वासात भरलेला पाहावयास मिळतो. 'ड्रोन'ने क्‍लिक केलेले माहूरगडाचे आजचे ताजे छायाचित्र या पार्श्वभूमीवर मनोवेधक ठरते आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी श्रीविष्णूंनी सह्याद्रीच्या रांगांमध्ये 'माहूर'चे अद्भुत मॉडेल तयार केले. नंतरच ब्रह्मदेवाने सृष्टीत जीवाशिवांची शिंपण केली. या आख्यायिकेत खोलवर न जाता 'ड्रोन'ने क्‍लिक केलेले माहूरगडाचे आजचे ताजे छायाचित्र या पार्श्वभूमीवर मनोवेधक ठरते आहे.

खरोखरच या दृश्‍यात ब्रह्मदेवाची सृष्टी अपूर्वाईच्या हिरव्या लेण्यांनी समृद्ध झालेली पाहताना अंत:करणापासून मन जगतपिता निर्मात्याला सलाम केल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्रातील शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या माहूरगडावर नवरात्राला प्रारंभ झाला. रेणुका देवीचा गजर माहूर गडाच्या चराचरांत ऐकावयास मिळतो. माहूरगड ऊर्जास्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. गडावर पायऱ्या चढताना श्वास भरून येतो. उंच शिखर गाठल्यावर मनाला एकदम तरतरी येते.

अवश्य वाचा : यंदा माहूरगडावर शुकशुकाट, भक्तांविना रेणुका मातेच्या उत्सवाला सुरुवात

माहूरगडात हिरवाईचे लेणे

माहूरगडाचे हिरवाईचे लेणे म्हणजे प्राणवायूच्या जणू लहरी. हाच वनराईतून मिळणारा प्राणवायू मनाला तजेला भरतो. देवीवरचा प्रचंड विश्वास हा भाविकांच्या प्रत्येक श्वासात भरलेला पाहावयास मिळतो. हा प्राणवायूने भरलेला श्वास ब्रह्मदेवाच्या सृष्टीतून विनासायास प्राप्त होतो, हेच सृष्टीचे देवत्व नव्हे का?

जाणून घ्या : नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा 'आविष्कार' आणि सन्मानाचा 'जागर'; एकीकडे भक्ती तर दुसरीकडे मात्र...

'जान हैं तो जहान है'

कोरोनाच्या काळात कोविड विषाणूने जीवाचे महत्त्व पटवून दिले. 'जान हैं तो जहान है'. श्वासावरील विश्वास दृढ केला. जिवंत राहावयाचे असेल, तर श्वासाचा भाता चालला पाहिजे. त्यासाठी प्राणवायूची आवश्‍यकता आहे. हा प्राणवायू ब्रह्मदेवाच्या शृष्टीतील हिरवाईच्या लेण्यांमधून मुक्तपणे उपलब्ध होतो. त्यामुळे वनराई जपण्याचा मौलिक संदेश आदिशक्तीच्या रेणुका गडावरून सहजपणे मिळतो. आकाशातून गडावरील हिरवाई व जलाशयांनी मंतरलेला भूभाग पाहताना कोणीही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. देवीचा जागर म्हणजे श्वासांचा जागर. प्राणवायूचे आगर आणि त्यासाठी नवरात्रात भरून आलेली माहूरगडावरील ब्रह्मसृष्टी. या हिरवाईने नटलेल्या सृष्टीची आराधना म्हणजेच रेणुका भक्ती नव्हे का?

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darshan of green creation from Mahurgada of Goddess Renuka