धक्‍कादायक... कोरोनाच्या धास्तीने चक्‍क कुटुंबीयांनीच नाकारला मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आरोग्य विभागाचे कर्मचारी मृतदेहाला हात लावत नसल्याने गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. मृतदेह समुद्रपुरात न्यावा की हिंगणघाटला यावरून दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांचे एकमत नसल्याने नागरिकांची फरफट झाली.

समुद्रपूर (जि. वर्धा) : जाम येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला कोरोनाची लक्षणे असल्याने त्याचा स्वॅब घेणे आणि शवचिच्छेदन करण्यावरून बराच काळ गदारोळ झाला. यात जिल्हा शल्यचिकित्सकांनी मध्यस्थी केल्याने मृतदेहाचे शेवटी समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून स्वॅब घेण्यात आले. यातही कोरोनाच्या संशयाने कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर प्रशासनानेच अंत्यसंस्कार केल्याची घटना जाम येथे घडली. 

जाम येथील 47 वर्षीय व्यक्तीस दहा दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप असल्याने तो घरीच होता. हा व्यक्ती चालक असल्याने कुठेही जाणे-येणे सुरू होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी 11 वाजतादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची सर्व लक्षणे कोरोनाची असल्याने त्याची कोरोना चाचणी करून अहवाल येईपर्यंत त्याचा मृतदेह शीतपेटीत ठेवावयाचा होता. जामचे सरपंच सचिन गावडे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत यांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली. मात्र, पीपीइ कीट नसल्याने त्याला रुग्णवाहिकेत टाकायचे कुणी, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

अधिक माहितीसाठी - Video : फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार
 

आरोग्य विभागाचे कर्मचारी मृतदेहाला हात लावत नसल्याने गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. मृतदेह समुद्रपुरात न्यावा की हिंगणघाटला यावरून दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांचे एकमत नसल्याने नागरिकांची फरफट झाली. नंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सूचनेवरून समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून त्याचा स्वॅब घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. 

सदर व्यक्ती कोरोना संशयित असल्याने मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी निर्णय घेत प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महेंद्र सूर्यवंशी, ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत, पोलिस पाटील कवडू सोमलकर, सरपंच सचिन गावंडे, ग्रामसेवक धोटे, तलाठी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body was not aacepted by the family fear of Corona