रुग्णालयात सफाईसाठी गेला कर्मचारी; शौचालयाच्या सीटमध्ये सळाख टाकताच बाहेर आले मृत अर्भक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

या घटनेची तक्रार सफाई कर्मचारी राजेश सुबराव शेट्टी यांनी चिमूर पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

चिमूर (जि. चंद्रपूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या वापरासाठी असलेल्या शौचालयात एकदिवसाचे मृत अर्भक शौचालयाच्या सीटमध्ये आढळून आले. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अर्भक मुलीचे होते.

उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वॉर्ड क्रमांक एकमधील शौचालयाची सफाई करून वरच्या माळ्यावर सफाईसाठी गेला. दरम्यान, रुग्णालयातील महिला कर्मचारी बाथरूमला गेली असता तिला शौचालय चोकअप दिसले. त्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्याने ही बाब सफाई कर्मचाऱ्याला सांगितली. सफाई कर्मचाऱ्याने शौचालय सीटमध्ये लोखंडी सळाख टाकली असता हात बाहेर आल्याचे दिसले. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांना माहिती देण्यात आली.

अधिक माहितीसाठी - भयंकर! मुलींची निर्वस्त्र पूजा करणारी टोळी जेरबंद; भोंदूबाबाला अटक

या घटनेची तक्रार सफाई कर्मचारी राजेश सुबराव शेट्टी यांनी चिमूर पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बागाटे, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, राजू गायकवाड करीत आहेत.

शौचालयात आढळले काचेचे तुकडे

उपजिल्हा रुग्णालयात तालुक्‍यातील अनेक महिला प्रसुती व इतर तपासणीसाठी येतात. मात्र, शौचालयात अर्भकाला कोंबून मारल्याची ही पहिलीच घटना आहे. सोयी, सुविधायुक्त असलेल्या या रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक एकमधील शौचालयात अर्भकाला बाहेर काढताना शौचालयाच्या बाजूला काच आढळले. त्यामुळे अर्भक कुमारी मातेचे असावे, अर्भकाची नाळ काचेने कापली असावी, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 

अधिक वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

रेकॉर्ड तपासले जाईल
उपजिल्हा रुग्णालयात महिला तपासणीसाठी येतात. त्यामुळे रविवारी कोण, कोण महिला आल्या होत्या त्याचे रेकॉर्ड तपासले जाईल. सीसीटीव्ही फुटेजमधून ती महिला नेमकी कोण आहे, याची माहिती होऊ शकेल. या संदर्भात चिमूर पोलिसात तक्रार दाखल केली. अर्भक उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे. 
- डॉ. गो. वा. भगत,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead infant found in hospital toilet in Chandrapur crime news