esakal | नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

बोलून बातमी शोधा

women died in railway accident on nagpur station}

महिला नागपुरातील नातेवाइकांच्या भेटीसाठी आल्या होत्या. पाहुणचार आटोपून गावी परतीच्या प्रवासाला निघाल्या. गुरुवारी सकाळी नातेवाइकाने त्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर आणून सोडले.

नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं
sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : डबा पकडण्याच्या घाईत महिला रेल्वेसोबतच धावू लागली. अचानक गाडी आणि फलाटादरम्यानच्या फटीतून ती रुळावर कोसळली. अपघाताने महिलेवर ओढवलेले जिवाचे संकट दोन्ही पायावर निभावले. बूटपॉलिश करणाऱ्या दोघांनी मदतीचा हात देत, तिला गाडीखालून बाहेर काढले. नागपूर रेल्वेस्थानकावर गुरुवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या महिलेवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

पुष्पमाला ओटे (५२) रा. पांढूर्णा असे मृत महिलेचे नाव आहे. त्या नागपुरातील नातेवाइकांच्या भेटीसाठी आल्या होत्या. पाहुणचार आटोपून गावी परतीच्या प्रवासाला निघाल्या. गुरुवारी सकाळी नातेवाइकाने त्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर आणून सोडले. ०२७२१ हैदराबाद- हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसने त्या रवाना होणार होत्या. डबा कुठे लागेल याची माहिती नसल्याने त्या आरपीएफ ठाण्याजवळ गाडीची वाट बघत होत्या. गाडी धडधडत आल्यानंतर इंजिननंतरच त्यांचा डबा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडी थांबून पुन्हा सुरू होण्यापूर्वी डब्यापर्यंत पोहोचता यावे या कल्पनेतून त्या गाडी शेजारून धावू लागल्या. टीसी ऑफिसजवळ गाडी आणि फलाटातील फटीतून त्या अचानक खाली पडल्या. अगदी काही क्षणातच गाडी थांबली आणि प्रवासी पुढे सरसावले. महिलेची हालचाल सुरू असल्याचे लक्षात आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. बूटपॉलिश करणारे हिरालाल गमधरे आणि राजीव मोहरे यांनी जोखीम स्वीकारून महिलेला गाडीखालून बाहेर काढले. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून मेयो रुग्णालयात पाठवून देण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - दिपाली वऱ्हाडेने शिक्षणासोबत पेलली गावाची जबाबदारी; वयाच्या २७ व्या वर्षी झाली सरपंच

१५ मिनिटे विव्हळत होती महिला - 
घटनेनंतर लागलीच रुग्णवाहिका बोलावून घेण्यात आली. महिलेला आत ठेवण्यातही आले. पण, मेमोसाठी सारेच अडले होते. सुमारे १५ मिनिटे महिला तिथेच रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत राहिली. त्याच वेळी रेल्वेचे डॉक्टर धावपळ करीत आले. मेमो मागून पाठवू पण पहिले उपचार सुरू करा, अशी सूचना त्यांनी केली आणि रुग्णवाहिका मेयोच्या दिशेने रवाना झाली. मात्र, तिथे त्यांचा मृत्यू झाला.