esakal | ई-पीक नोंदणीची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture

ई-पीक नोंदणीची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती - राज्य सरकारने सुरू केलेल्या ई-पीक पाहणीला शेतकऱ्यांकडून नैसर्गिक आपत्तीमुळे थंड प्रतिसाद आहे. 15 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती, ती आता 15 दिवसांनी वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणीकडे पाठ फिरवणे सुरू केले आहे.

15 ऑगस्टला शुभारंभ झालेल्या ई-पीक पाहणी मोहिमेस शेतकऱ्यांकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्यामागे पावसाची रिपरिप, शेतातील चिखल व इंटरनेट कनेक्शन न मिळणे कारणीभूत ठरले आहेत. सद्या जिल्हाभर पाऊस कोसळत आहे. शेतात जाणारी वाट चिखलमय बनली आहे. शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी प्रत्यक्ष शेतात जाऊन करायची आहे. पिकांचे छायाचित्र अपलोड करायचे आहे. ज्या अ‍ॅपमध्ये ही सर्व नोंदणी करायची आहे ते तासन् तास बीझी आहे. एकाचवेळी या अ‍ॅपवर विविध ठिकाणांहून नोंदणी होत असल्याने सर्व्हरवरील ताण वाढला आहे. परिणामी एका शेतकऱ्याला नोंदणीसाठी दीड ते दोन तासांहून अधिक वेळ लागत आहे. अखेर कंटाळून तो नोंदणी करणे सोडून देऊ लागला आहे.

हेही वाचा: राज्य सरकारला मोठा धक्का, डॉ. तायवाडे देणार आयोगाचा राजीनामा

ई नोंदणीला प्रारंभी सकारात्मक प्रतिसाद होता, तो आता नकारात्मक रूप घेऊ लागला आहे. 11 सप्टेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यात 7 लाख 21 हजार 481 सातबारापैकी 1 लाख 11 हजार 308 म्हणजे सरासरी 25 टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नोंदणीची ही टक्केवारी बघता 15 सप्टेंबर ही मुदत वाढविण्यात आली असून, नोंदणी आता 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. पंधरा दिवस अतिरिक्त देण्यात आले असले तरी तांत्रिक अडचणी मात्र राज्य सरकारने सोडविलेल्या नाहीत. पावसाची रिपरिप काही भागांत सुरूच आहे. शेतात सध्या चिखल आहे, तो तुडवत शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. यादरम्यान सर्व्हर गतीमान करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

काय आहेत अडचणी?

* सातत्याने सुरू असलेला पाऊस

* शेतात जाण्याची वाट चिखलमय

* इंटरनेट कनेक्शन नाही

* अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईलची वानवा

* सर्व्हरवरील ताण वाढलेला

loading image
go to top