प्रियकर म्हणाला चल पळून जाऊ...बसवले दुचाकीवर अन्‌ नेले ईथे 

file photo
file photo

चिखलदरा ( जि. अमरावती) : सहा महिन्याची गर्भवती असलेल्या प्रेयसीने लग्नासाठी हट्ट धरल्यामुळे तिच्या प्रियकराने स्कार्फने गळा आवळून व शस्त्राने हल्ला करून 11 डिसेंबर 2019 रोजी खून केला. प्रियकरास शनिवारी (ता. चार) अटक केल्यामुळे या घटनेचे रहस्य उलगडले. 

रेखा केज्या धुर्वे (वय 25 रा. ब्राह्मणवाडा पाठक, ता. चांदूरबाजार) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी आज (ता. चार) सायंकाळी छोटू उर्फ अस्लम अली अहमद अली (वय 35 रा. खरपी) यास अटक केली. चिखलदरा तालुक्‍यात घटांगच्या जंगलामध्ये 12 डिसेंबर 2019 रोजी एका गर्भवती अनोळखी युवतीचा (वय 25) मृतदेह आढळला होता. गळ्याभोवती स्कार्फ आणि शरीरावर शस्त्राचे वार होते.

रागाच्या भरात रेखाचा खून

चिखलदरा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. छोटू उर्फ अस्लमला अटक केल्यानंतर त्याने रेखा हिच्या खुनाची कबुली दिली. ही घटना 11 डिसेंबर 2019 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी त्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले. मृत रेखा हिचा भाऊ राजेश धुर्वे (रा. खरपी) याच्यासह, आई आणि नातेवाइकांनी चिखलदरा पोलिसांशी संपर्क साधला. कपडे, स्कार्फ आणि फोटो सर्वांनी ओळखल्याने रेखा हिच्या मृतदेहाची ओळख पटली. रेखा धुर्वे हिची काही वर्षांपासून छोटू उर्फ अस्लम सोबत ओळख होती. त्यातून रेखा ही सहा महिन्यांची गर्भवती झाली. पोटात असलेले अपत्य हे छोटू याचेच असून, लग्न कर, लग्न न केल्यास नातेवाइकांना त्याबाबत माहिती सांगेन असे रेखा हिने त्याला बजावले होते. त्यामुळे छोटू उर्फ अस्लम याने रागाच्या भरात रेखाचा खून केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणाच्या तपासासाठी सहभागी

याप्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक विनायक लंबे आणि शहाजी रुपनर यांची दोन स्वतंत्र पथके तयार केली होती. उपनिरीक्षक युवराज उईके, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. लाखोडे, श्री. पुरोहित, ईश्वर जांभेकर, श्री. वर्मा, प्रमोद धुरंधर, श्री. नंदनवार यांचे पथक कारवाईत सहभागी होते. 

पळून जाऊ असे सांगून केला खून 

आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगून छोटू उर्फ अस्मल याने रेखा हिला ब्राह्मणवाडा येथून परतवाड्यात बोलाविले. परतवाड्याहून दुचाकीवर बसवून त्याने चिखलदरा येथील घटांग जंगलात नेले व खून करून पुरावा नष्ट केला, असे पोलिस निरीक्षक आकाश शिंदे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com