चराईसाठी आलेल्या 45 मेंढ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळांचे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना नांदुरा तालुक्यातील वळती बु. येथे घटना आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) :  तालुक्यातील वळती बु. येथे चराईसाठी आलेल्या हिवरखेड ता. खामगाव येथील अर्जुन पारखे व संदीप शिंदे यांच्या मालकीच्या अंदाजे 45 मेंढ्या अज्ञात रोगाने मरण पावल्या. यामुळे त्यांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना 14 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाची नांदुरा व खामगाव येथील टीम तेथे दाखल झाली आहे.

नांदुरा तालुक्यातील वळती बु. येथे खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील काही मेंढपाळांनी खरीप हंगाम संपत असल्याने खाली होणाऱ्या कपाशी व ज्वारी पिकाच्या शेतात चराईसाठी मेंढ्या आणल्या आहे. दोन दिवसांपूर्वी वादळ व वाऱ्यासह पाऊस झाल्याने खराब हवामानामुळे विषबाधाजन्य रोगामुळे त्याच्या जवळपास 45 मेंढ्या दगावल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अकस्मात आलेल्या या संकटामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या मेंढ्यांची मरतुक अजूनही थांबत नसल्याने व झालेले नुकसान सहन न झाल्याने अर्जुन पारखे हिवरखेड हे चक्कर येऊन पडले होते. यावेळी त्यांचेवर उपचार करण्यात आले. 

महत्त्वाची बातमी - पीक कर्जाची परतफेड ठरतेय गळ्याचा फास

अन् मेंढपाळ कुटुंब राहिले उपाशी
मेंढ्याचा मृत्यू झाल्याने अश्या परिस्थितीत त्यांचे सर्व कुटुंब सकाळपासून उपाशी होते. या प्रकरणाची दखल घेत पशुसंवर्धन विभागाची नांदुरा व खामगाव येथील टीम घटनास्थळावर दाखल होऊन उपचार केले जात आहेत. तहसीलदार यांनी आदेश देऊन तत्काळ पंचनामे करायला सांगून मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल सादर करावा अशी मागणी होत आहे. एकंदरीत झालेल्या नुकसानीसाठी त्वरित मदत देण्याची मागणी या मेंढपाळांकडून केली गेली आहे.

जाणून घ्या - आघाडीचे अधिकार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना

नुकसान भरपाईची मागणी
या मेंढ्यांचे नुकसान हे सहा लाखाच्यावर असून, अजूनही नुकसान थांबलेले नाही, अश्या परिस्थितीत तहसीलदार यांनी हस्तक्षेप करून लवकरात लवकर मेंढपाळांना मदत करावी व त्यांना धीर द्यावा, मेंढपाळ गावोगावी भटकत असल्यामुळे त्यांना असल्या संकटाचा सामना करावा लागत आहे तरीही प्रशासनाने तातडीने त्यांना मदत करावी.
-महादेव हटकर, हिवरखेड ता.खामगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of 45 sheep