उसनवारीवर चढली न्यायालयाची पायरी; मात्र, न्यायाचा प्रतीक्षेतच तो संपला

श्रीकृष्ण गोरे-नीलेश झाडे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

उपविभागीय कार्यालयापुढे कुटुंबाने भीक मागो आंदोलन केले. पोलिसांनी देवू कुळमेथे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचाराला शरीर साथ देत नव्हते. कुटुंबानी गावाकडे देवू यांना आणले. परंतु, येता-येता देवू यांनी पोलिस ठाण्यासमोर रुग्णवाहिका उभी केली अन्‌ "मी मेलो तर माझ्या मृत्यूला कंपनी जवाबदार असल्याची' तक्रार दाखल केली. 

राजुरा (जि. चंद्रपूर) : स्वत:वर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तो सतत लढत राहिला... कधी उपाशीपोटी आंदोलन केले... कधी उपोषण... उसनवारी करून न्यायालयाची पायरी चढली... प्रशासनाला हात जोडले... परंतु, न्यायासाठी डोळे आसुरलेलेच होते... ज्यांच्या हातात सत्ता आहे, शाशन व प्रशाशन त्यांचेच ऐकते... त्यांच्यापुढे ताठ माणेने बोलणाऱ्या या लढवय्यावर भीक मागण्याची वेळ आली... त्यात कुटुंबावर होणारी उपासमार तो बघत होता अन्‌ लढत राहिला... न्यायाचा प्रतीक्षेत तो संपला. कंपनीच्या मारक धोरणांचा बळी ठरलेले देवू कुळमेथे यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका. हा तालुका आदिवासी बहुल आहे. तालुक्‍यातील अनेक आदिवासी बांधवांची जमीन जिवती व राजुरा तालुक्‍यात आहेत. आदिवासी आणि कोलाम बांधवाची जमीन माणिकगड सिमेंट कंपनीने हडपली असा आरोप आदिवासी बांधवांचा आहे. आपल्या जमिनी परत मिळविण्यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. येथील कुटुंबांचा उसनवारी करून न्यायासाठी लढा सुरू आहे. लढता-लढता आदिवासी बांधवांचा आवाज कायमचाच हरविला जात असतानाही शाशन, प्रशासनाला त्यांचा आवाज ऐकू येऊ नये ही मोठीच शोकांतिका आहे. 

अधिक वाचा - खाणीत पकडत होता मासे अचानक जाळ्यात अडकला पाय... मग

जिवती तालुक्‍यातील कुसूंबी गावातील देवू कुळमेथे हा असाच एक न्याय हक्कासाठी लढणारा माणूस. देवू यांची जमीन कंपनीने हळप केली अन्‌ बेकायदेशीर जमिनीत चुनखडीचे उत्खनन केले, असा आरोप कुटुंबीयांचा आहे. जमिनीवरच कुटुंबाचे पोट भरायचे. जमीनच गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यानंतर गेलेली जमीन मिळविण्यासाठी देवू यांच्या संघर्ष सुरू झाला. यासाठी आंदोलन केले व उपोषण केले. न्यायालयाची पायरीही चढली. परंतु, हात रिकामेच राहिले. 

या लढ्यात आबिद अली या सामाजिक कार्यकर्त्याची मोलाची साथ देवू यांना लाभली. संघर्ष तेवत होता; पण शरीर थकले. खाट धरलेल्या देवू कुळमेथे यांच्यावर उपचार करण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. उपविभागीय कार्यालयापुढे कुटुंबाने भीक मागो आंदोलन केले. पोलिसांनी देवू कुळमेथे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचाराला शरीर साथ देत नव्हते. कुटुंबानी गावाकडे देवू यांना आणले. परंतु, येता-येता देवू यांनी पोलिस ठाण्यासमोर रुग्णवाहिका उभी केली अन्‌ "मी मेलो तर माझ्या मृत्यूला कंपनी जवाबदार असल्याची' तक्रार दाखल केली.

ठळक बातमी - मैत्रिणीच्या वडिलानी केलेल्या अत्याचारातून अल्पवयीन झाली साडेपाच महिन्यांची गर्भवती, आता उभा झाला हा प्रश्‍न...

आतातरी लक्ष द्याल का?

हडपलेली जमीन कुटुंबाला परत मिळवून देऊ यासाठी लढता लढता देवू कुळमेथे यांनी गुरुवारी अखेरचा श्‍वास घेतला. जातांना त्यांचे हात रिकामे होते. आपली जमीन मिळविण्यासाठी अश्‍या अनेक "देवू'चा संघर्ष सुरू आहे. रिकाम्या हाताने पुन्हा किती देवू देवाघरी जाणार? हा खरा प्रश्‍न आहे. आपल्या जमिनी परत मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गरीब आदिवासी, कोलाम बांधवांकडे शाशन आता तरी लक्ष देईल का? की पुन्हा कुणाचा बळीची वाट बघेल हाच खरा प्रश्‍न आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Daewoo who fought for justice