विहिरीत मलबा अंगावर पडून मजुराचा मृत्यू; सहा दिवसांनी झाला गुन्हा दाखल

क्रिष्णा लोखंडे
Sunday, 24 January 2021

तिघांनाही तातडीने तिवसा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान धीरज कुरवाळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत धीरजचे वडील राजेंद्र कुरवाळे (वय ४७, रा. निंभार्णी) यांनी शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अमरावती : विहिरीत काम करीत असताना मलबा भरलेला क्रेनचा टब मजुरांच्या अंगावर पडला. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन मजूर जखमी झाले. शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळजापूर शेतशिवारात ही घटना १७ जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी २३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज राजेंद्र कुरवाळे (वय २१, रा. निंभार्णी) असे मृत तर भूषण दिलीप मारबते (वय २३) व विक्की नरेंद्र बादशे (वय २५, दोघेही रा. निंभार्णी) अशी जखमींची नावे आहेत. १७ जानेवारी रोजी तुळजापूर शिवारातील जयकृष्ण छापाने यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. यावेळी धीरज, भूषण व विक्की मजूर म्हणून कामावर होते.

विहिरीत खोदकाम केल्यावर राजेश काशिनाथ उमक (वय ४०, रा. कमळापूर) यांच्या मालकीच्या क्रेनच्या टबमधून मलबा बाहेर काढण्यात येत होता. यावेळी धीरज, भूषण व विक्की हे तिघेही क्रेनच्या टबमध्ये मलबा भरून देत होते. त्याचवेळी क्रेनच्या टबचा नटबोल्ट स्लिप झाला. त्यामुळे मलबा भरलेला क्रेनचा टब धीरज, भूषण व विक्कीच्या अंगावर पडला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.

नक्की वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

तिघांनाही तातडीने तिवसा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान धीरज कुरवाळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत धीरजचे वडील राजेंद्र कुरवाळे (वय ४७, रा. निंभार्णी) यांनी शिरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी क्रेनमालक राजेश उमक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a laborer due to falling debris in a well Amravati crime news

Tags
टॉपिकस
Topic Tags: