...तिघांच्या मृत्यूने तरनोळी बुडाली शोकसागरात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बोदेगाव येथील बंद साखर कारखान्याच्या समोर असलेल्या अंधारात चालकाने ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्‍टर वा इंडिकेटर लावले नसल्याने ट्रॅक्‍टर ट्रॉली मागून येणाऱ्या मोटरसायकलस्वारांना दिसली नाही. त्यामुळे दुचाकी (एम. एच. 29 बी. एम. 4612) ही ट्रॅक्‍टरच्या मागे असलेल्या ट्रॉलीवर भरधाव जाऊन आदळली.

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील बोदेगाव येथे झालेल्या ट्रॅक्‍टर व दुचाकीच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या तिसऱ्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. 6) रात्री साडेआठच्या सुमारास बोदेगाव येथील बंद असलेल्या साखर कारखान्यासमोर घडली. 

अंधारात ट्रॉलीवर आदळली दुचाकी

मिथून तुकाराम जाधव (वय 26), पवन हरी बोने (वय 23) व दिलीप बन्सी जाधव (वय 35, तिघेही रा. तरनोळी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. उसाची भरती असलेला डबल ट्रॉली ट्रॅक्‍टर (एम.एच.29 व्ही.1879) बोदेगाव येथून मांगूळ येथील कारखान्याकडे जात होता. बोदेगाव येथील बंद साखर कारखान्याच्या समोर असलेल्या अंधारात चालकाने ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्‍टर वा इंडिकेटर लावले नसल्याने ट्रॅक्‍टर ट्रॉली मागून येणाऱ्या मोटरसायकलस्वारांना दिसली नाही. त्यामुळे दुचाकी (एम. एच. 29 बी. एम. 4612) ही ट्रॅक्‍टरच्या मागे असलेल्या ट्रॉलीवर भरधाव जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवरील तीनपैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

 

अवश्‍य वाचा- बोंबला, भागवतासाठी आला अन्‌ बायको घेऊन पळाला  

 

ट्रॅक्‍टरचालक पोलिसांच्या ताब्यात

बोदेगाव येथे अपघात झाल्याचे कळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्‍टरचालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. 

ग्रामस्थांमधून हळहळ

बोदेगावजवळील साखर कारखान्यासमोर रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तरनोळी या गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाला. त्यामुळे तरनोळी गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...The death of three youths Tarnoli sank into mourning