...अन् कर्जमुक्तीची यादी आलीच नाही!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 28 फेब्रुवारीला संपूर्ण गावांच्या पात्रता याद्या जाहीर होणार होत्या, त्यामुळे राज्यभरातील शेतकरी टकटकी लावून बसले होते. परंतु, कर्जमुक्तीची यादी जाहीर झालीच नाही अन्  त्यांची दिवसभराची प्रतीक्षा निष्फळ ठरली.

अकोला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 28 फेब्रुवारीला संपूर्ण गावांच्या पात्रता याद्या जाहीर करण्यात येणार होत्या. त्यामुळे शुक्रवारी (ता.28) पूर्ण दिवस राज्यभरातील शेतकरी याद्यांच्या प्रतीक्षेत टकटकी लावून बसले होते. शेवटी दिवस मावळला परंतु, कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याच नाही.

नैसर्गिक, अनैसर्गिक समस्यांनी वेढलेल्या आणि आर्थिक स्थिती बिकट झालेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्जमुक्ती देण्याची घोषणा करुन राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर काही कालावधितच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती सरकारने जाहीर केली. योजनेंतर्गत लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला जाणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार 24 फेब्रुवारी रोजी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांच्या पात्रता याद्या जाहीर करुन, संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या आधार प्रमाणीकरणानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. उर्वरित संपूर्ण गावांच्या याद्या 28 फेब्रुवारीला जाहीर करुन, त्यानंतर काही तासातच शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे राज्यस्तरावरुन सांगितले जात होते. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर राज्यातील शेतकरी, संबंधित अधिकारी, कर्मचारी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर होण्याची प्रतीक्षा करीत होते परंतु, रात्री उशिरापर्यंतही योद्या जाहीर झाल्याच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली सोबतच याद्या का आल्या नाहीत, या विषयावरून गावागावात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले.

या जिल्ह्यांच्या याद्या जाहीर
कर्जमुक्ती योजनेंतर्गत 28 फेब्रुवारीला सर्वच जिल्ह्यांतील सर्वच गावांच्या याद्या जाहीर केल्या जाणार होत्या. परंतु, रात्री उशिरापर्यंत केवळ पाचच जिल्ह्याच्या पात्रता याद्या जाहीर झाल्या असून, त्यामध्ये वाशीम, धुळे, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.

जिल्हा बँकेचे 53 हजार 600 शेतकरी पात्र
सायंकाळी उशिरा वाशीम जिल्ह्यातील पात्रता याद्या जाहीर झाल्या. त्यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 53 हजार 600 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरविण्यात आल्याची माहिती अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मिळाली.

ग्रामपंचायत निवडणूक बनले कारण!
काही जिल्ह्यांमध्ये लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांच्या कर्जमुक्ती पात्रता याद्या जाहीर करण्यात आल्या नसल्याची चर्चा आहे. परंतु, या चर्चेला फाटा देत 29 फेब्रुवारीला सुद्धा पात्रता याद्या जाहीर केल्या जाण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The debt relief list has not been released