
वन्यप्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अशा परिस्थितीत लग्नासाठी पैसे आणायचे कुठून? या विवंचनेत आई-वडील होते. आई-वडिलांची परिस्थिती पाहून मोहिनीसुद्धा सतत चिंतेत असायची व याच भावनांचा उद्रेक होऊन तिने गळफास घेतला.
नेरपिंगळाई (जि. अमरावती) : कर्जबाजारी असलेल्या वडिलांकडे लग्नासाठी पैसे नाही. चिंताग्रस्त वडिलांची स्थिती पाहली जात नसल्याने शेतकऱ्याच्या चोवीस वर्षीय मुलीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावात शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी उजेडात आली. मोहिनी अरुण टिंगणे (वय २४) असे घरीच गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
नेरपिंगळाई येथील अरुण विठ्ठल टिंगणे यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांनी या जमिनीवर सेंट्रल बॅंकेच्या नेरपिंगळाई शाखेतून एक लाख १८ हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. यावर्षी निसर्गाची साथ लाभली नाही. सोयाबीन पिकावर खोडकीडा व कपाशीवर बोंडअळी आल्याने पिके उद्ध्वस्त झाली. त्यात वन्यप्राण्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
क्लिक करा - पोलिसांना झाले काय? वाहतूक पोलिस शाखेत एटीपीच्या नावाखाली वसुलीबाज युवक
वडिलांची आर्थिक परिस्थिती एकदम ढासळलेली. यातच यावर्षी मुलगी मोहिनीचे लग्न करायचे होते. आर्थिक अडचणीमुळे घरात चिंतेचे वातावरण होते. त्यात बॅंकेचे अगोदरच देणे आहे. मग लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव कसे करणार. वडिलांची दयनीय परिस्थिती मुलीला पाहावत नव्हती.
त्यामुळे २५ डिसेंबर रोजी आई-वडील व भाऊ शेतात गेल्यानंतर मोहिनीने घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई-वडील घरी परत आल्यानंतर लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलेल्या मुलीचा लोंबकळत असलेला मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला.
मोहिनीचे शिक्षण मोर्शीच्या आर. आर. लाहोटी महाविद्यालयातून बीएससी (गणित) पर्यंत झाले होते. पुढे एमएससी करण्यासाठी पैसे नसल्याने तिला शिक्षण थांबवावे लागले होते. यावर्षी लग्न उरकून टाकावे म्हणून पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. वडिलांना दोन एकरात पाच क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले. यामध्ये लागवड आणि मशागत खर्चसुद्धा निघाला नाही. सोयाबीनसुद्धा खोडकीडीने सडल्याने बेभाव विकावे लागले.
वन्यप्राण्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अशा परिस्थितीत लग्नासाठी पैसे आणायचे कुठून? या विवंचनेत आई-वडील होते. आई-वडिलांची परिस्थिती पाहून मोहिनीसुद्धा सतत चिंतेत असायची व याच भावनांचा उद्रेक होऊन तिने गळफास घेतला.
शनिवारी (ता. २६) दुपारी एक वाजता शवविच्छेदन करून मोहिनीचे पार्थिव घरी आणले असता नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी दीड वाजता मोहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसर हादरला असून, गावावर शोककळा पसरली होती.
कर्जबाजारी व आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्याच्या लेकीला जीवनप्रवास संपवावा लागला. शासनाने याची दाखल घेऊन कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेरपिंगळाई शाखेने केली आहे.
अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठविण्यात येईल
मृत युवतीचे वडील अरुण टिंगणे यांच्या बयाणावरून नापिकीमुळे आलेल्या आर्थिक अडचणीने मोहिनीने आत्महत्या केल्याचे कळते. तसा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
- केशव ठाकरे,
ठाणेदार, शिरखेड पोलिस ठाणे