नागभीड - सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी तालुक्यातील मिंथूर येथील एका शेतकऱ्याने कंबोडियात जाऊन आपली किडनी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गाव हादरले आहे..मात्र, हा धक्का एवढ्यावरच थांबलेला नाही. आता सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली अत्यल्प मोबदल्यात जमीन संपादित करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने मिंथूर आणि नवेगावपांडव ही जुळी गावे पुन्हा एकदा कर्जाच्या गर्तेत ढकलली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.या भागातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. सिंचनाची कोणतीही ठोस सुविधा नसल्याने शेतकरी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहेत. पाऊस झाला तर जगण्याची आशा, नाही झाला तर कर्जाचा फास आवळतो हे इथले वास्तव आहे. गोसेखुर्द धरणाचा उजवा कालवा गावातून गेला असला, तरी त्याचे पाणी आजवर शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेले नाही..दरम्यान अड्याळ उपसा सिंचन योजना व सौरऊर्जा प्रकल्पासाठी मिंथूर–नवेगाव परिसरातील पाच ते सहा एकर सुपीक शेती संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात झालेल्या सुनावणीत शेतकऱ्यांना केवळ एक लाख रुपये मोबदला देण्यात येईल, असे सांगण्यात आले. सध्या या भागातील जमिनीचा बाजारभाव प्रती एकर १० ते १५ लाख रुपये असताना एवढ्या तुटपुंज्या मोबदल्याने शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असल्याची भावना आहे..एकीकडे कर्जफेडीसाठी शेतकरी आपले अवयव विकतो आणि दुसरीकडे शासन सौरऊर्जा प्रकल्पासाठी आमची शेती कवडीमोल भावात घेत आहे. हा विकास नाही, हा शोषणाचा नवा प्रकार आहे, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. योग्य मोबदला न दिल्यास शेतजमीन देण्यास ठाम नकार देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही पाठविण्यात आले आहे..गाव हादरलेकंबोडियात जाऊन आठ लाख रुपयांत किडनी विकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मिंथूर हादरले. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 'आज जमीन, उद्या काय?' असा प्रश्न गावकऱ्यांच्या डोळ्यांत दिसत आहे.शेतकरी हा त्यांच्या जमिनीचा भू-स्वामी आहे. त्यांच्या सहमतीविना प्रशासनाने जर बळजबरीने भूसंपादन केले तर आम्ही शेतकरी आत्मदहनाचा टोकाचा पर्याय उचलणार.- गजानन कोहपरे, मिंथूर, ता. नागभीड..अगोदरच आमच्या गावात सिंचनाची सुविधा नाही. डोक्यावर कर्ज उभे आहे. त्यातच आमच्या शेती आता कवडीमोल भावात मागत आहेत. आम्हाला सरकारने न्याय द्यावे.- हिवराज कोहपरे, मिंथूर ता. नागभीड.शेतकरी कर्जबाजारी होऊन राहिले आहेत. आम्हाला योग्य भाव मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. आमची शेती जात असल्यामुळे सरकारने आमच्या परिवारातील एका कुटुंबाला शासकीय नोकरी द्यावी.- संजय बोरकुटे, मिंथूर..भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच जमीन घेतल्या जाईल. जोपर्यंत त्यांची संमती मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्या जमिनी वापरल्या जाणार नाही.- प्रविणी पाटील, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी.माझी शेती नवेगाव पांडव येथे आहे. गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यासाठी माझी एक एकर शेती गेली. पण त्याचा मोबदलाही कमी देण्यात आला. आता परत सौरऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे. या भागात प्रती एकर १० ते १५ लाख रुपये भाव आहे. तो भाव आम्हाला देण्यात यावा.- यादवेंद्र रामदास हजारे, रा. मिंथूर ता. नागभीड..कालव्यात गेल्या जमिनीगोसेखुर्दचा उजवा कालवा नवेगावपांडव आणि मिंथूर या गावांतून गेला आहे. गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामात काही वर्षांपूर्वी याच गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्याचा मोबदलाही कमी देण्यात आल्याची माहिती यादवेंद्र रामदास हजारे, गजानन कोहपरे, संजय बोरकुटे, हिवराज कोहपरे यांनी दिली. आता परत सौरऊर्जा प्रकल्प होणार आहे. त्यासाठी जमिनी संपादित करण्यात येणार आहे. मात्र, आता आम्ही शेतजमिनी देणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.