फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी चुकीची होती; महाविकासआघाडीतील मंत्र्याचा दावा

चेतन देशमुख
Sunday, 1 November 2020

काँग्रेस भवनाच्या जागेसाठी माणिकराव ठाकरे यांनी प्रयत्न केले. त्यासोबतच जिल्ह्यातील इतरही नेत्यांनी पाठपुरावा केल्याने भव्यदिव्य वास्तू यवतमाळात उभारण्यात येणार आहे. याचाच कित्ता राज्यभरा राबविण्यात येणार आहे. राज्यात काँग्रेस भवन उभारण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री थोरात यांनी दिली.

यवतमाळ : जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे गत वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मतभेद दूर करून एकजुटता दाखवावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष बांधणी करावी, असेही ते म्हणाले.

येथील वादाफळे पॅलेसमध्ये शनिवारी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, नितीन कुंबलकर, आशीष दुआ, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, सचिन नाईक, वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष वझाहत मिर्झा, सध्या सव्वालाखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा - प्रेमप्रकरणातून झाले भांडण अन् युवकाने उचलले हे पाऊल

काँग्रेस भवनाच्या जागेसाठी माणिकराव ठाकरे यांनी प्रयत्न केले. त्यासोबतच जिल्ह्यातील इतरही नेत्यांनी पाठपुरावा केल्याने भव्यदिव्य वास्तू यवतमाळात उभारण्यात येणार आहे. याचाच कित्ता राज्यभरा राबविण्यात येणार आहे. राज्यात काँग्रेस भवन उभारण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री थोरात यांनी दिली. येणाऱ्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहे. यात एकजुटता दाखविल्यास आपल्याला यश नक्कीच मिळेल, असेही थोरात म्हणाले.

कोरोनाच्या काळात कर्जमाफीचा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला. फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी अतीशय चुकीची होती. मात्र, महाविकासआघाडीने कुठल्याही अडथळाविना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, असेही ते म्हणाले. मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वड्डेटीवार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, खासदार बाळू धानोरकर, माजीमंत्री माणिकराव ठाकरे, आशीष दुआ आदींनी विचार व्यक्त केले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The debt waiver made by the Fadnavis government was wrong