अबब! नऊ टक्‍के घटले जंगल, गडचिरोलीतील वनवैभवावरच कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा, अहेरी, भामरागड, चामोर्शी या भागातून मोठ्या प्रमामात बाहेरून लोक आले. त्यामुळे त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगल तोड करून शेतीसाठी वनजमिनीवर अतिक्रमण केले. अतिक्रमीत लोकांना शासनाकडून वनजमिनीचेपट्टे वाटप करण्यात आले. मात्र, चुकीचा अर्थ लावून नव्याने जंगलतोड करून शेतीसाठी वृक्ष तोड केली जात असल्याचे प्रकार वाढले
आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गडचिरोली : स्वार्थी माणसाच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे दिवसेदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. आता तर माणसाचा स्वार्थ गडचिरोलीतील वनवैभवाचा घास घेऊ बघत आहे. हा मानवी हस्तक्षेप इतका वाढला की चक्‍क वनवैभवाने नटलेले गडचिरोलीतील जंगल तब्बल 9 टक्‍क्‍यांनी कमी झाले. घरगुती कामासाठी लाकडाचा वाढता वापर तसेच वनहक्क कायद्यांतर्गत वनजमिनीचे पट्टे मिळावे या लालसेतून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्या जागेचा शेतीसाठी वापर केला जात असल्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. यामुळे वनवैभव म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष तोडीने गेल्या काही वर्षात तब्बल नऊ टक्‍क्‍यांनी जंगल
घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मौल्यवान सागवान वृक्ष, वनऔषधी ,बांबू, तेंदूपत्ता, रानमेवा तसेच रानभाज्यासाठी प्रशिद्द असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जंगलामुळे रोजगार सुद्धा मिळतो. नक्षलवाद्यांच्या कारवाया सोडल्या तर हा जिल्हा शांत आहे. 50 वर्षे पुरेल एवढी साधन संपत्ती अनेक भागात उपलब्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षात वृक्षतोडीने वन वैभवाला खिंडार पाडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्‍याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यात गेल्या अनेक वर्षापासून सागवान तस्करी सुरू आहे. तेथील राज्यात सागवान लागडाला चांगला भाव मिळत असल्याने स्थानिकांच्या मदतीने तस्कर नदीपात्रातून सागवान लठ्ठे चोरून नेतात. वन विभागाच्या उपाययोजनेनंतर तस्करी कमी झाली असली तरी जिल्ह्याच्या अनेक भागात वृक्षतोड चिंतेचा विषय बनला आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 14 हजार 412 वर्ग किलोमीटर एवढे आहे. त्यात 10 हजार 94 वर्गकिलोमीटर एवढे जंगल होते. 2013 मध्ये दोन किमीची भर पडून 10 हजार 96 वर्गकिलोमीटर झाले. 2015 मध्ये एक किमीची भर पडून 10 हजार 97 वर्गकिलोमीटर जंगल घटून 10 हजार 4 वर्ग किलोमीटर जंगल शिल्लक राहिले तर 2019 मध्ये 87.02 किमीची घट झाली आहे. त्यामुळे आता 9916.16 वर्गकिमी जंगल शिल्लक आहे. 76 टक्‍के जंगलाची नोंद असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता 69.26 टक्‍के जंगल शिल्लक राहिला आहे.

वैयक्तिक दाव्यासाठी वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा, अहेरी, भामरागड, चामोर्शी या भागातून मोठ्या प्रमामात बाहेरून लोक आले. त्यामुळे त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगल तोड करून शेतीसाठी वनजमिनीवर अतिक्रमण केले. अतिक्रमीत लोकांना शासनाकडून वनजमिनीचेपट्टे वाटप करण्यात आले. मात्र, चुकीचा अर्थ लावून नव्याने जंगलतोड करून शेतीसाठी वृक्ष तोड केली जात असल्याचे प्रकार वाढले
आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाचे क्षेत्र कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा - हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन..
.
जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच
"वृक्ष तोड रोखण्यासाठी वनकर्मचारी नेहमीच सतर्क असतात. मात्र, यासंदर्भात तक्रारी आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही लागलीच संबंधितावर कारवाई करतो. एटापल्ली तालुक्‍यातील बुर्गी येथे अशीच एक तक्रार आली होती. या प्रकरणात काही लोकांना अटक सुद्धा केली.
जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी सर्वांचीच असल्याने वृक्ष तोडीच्या घटनेबाबत वन विभागाला माहिती द्यावी, यावर तत्काळ ऍक्‍शन घेतली जाईल"".
एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deforestation in Gadchiroli