पैशासाठी विकला पोटचा गोळा; एवढ्या रुपयांत झाला होता सौदा, पण... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

5 जून रोजी मध्यरात्री कुटकी येथील बालकाला दिल्ली येथील व्यक्तींना देण्यात आले होते. यासंदर्भात नऊ जून रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे बाळाचे आजी व आजोबा यांनी तक्रार नोंदवली.

वर्धा : बाळाला दत्तक देण्यासाठी शासनाचा कायदा असताना हिंगणघाट तालुक्‍यातील आई-वडिलांनी त्यांच्या 15 दिवसांच्या बाळाला दिल्ली येथील दाम्पत्याला दत्तक दिले. यासंदर्भात बाळाच्या आजी आजोबांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षात तक्रार केली. या तक्रारीवरून चौकशी करीत जिल्हा बाल संरक्षण समितीच्या तक्रारीवरून बाळाच्या आई-वडिलांसह दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यावर वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

5 जून रोजी मध्यरात्री कुटकी येथील बालकाला दिल्ली येथील व्यक्तींना देण्यात आले होते. यासंदर्भात नऊ जून रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे बाळाचे आजी व आजोबा यांनी तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच लगेच चौकशीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित प्रकरणाची माहिती गोळा केली व अहवाल महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेला पाठविण्यात आला. विभागाच्या वरिष्ठ अधिकारी बिरारीस व जिल्हा बालसंरक्षण अधिकारी ज्योती कडू यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईचे आदेश दिले. चौकशीअंती वडनेर पोलिसांत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी तक्रार दाखल केली. 

पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...
 

बाळाचे जैविक आईवडील व ज्यांना 15 दिवसांचे बाळ अवैधरीत्या देण्यात आले त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 च्या कलम 80 व 81 नुसार ही कारवाई करण्यात आली. तसेच 27 जून 2020 रोजी बाळाच्या जैविक आई आणि वडील यांना ताब्यात घेण्यात आले. हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, नीलेश ब्राह्मणे व वडनेर पोलिस ठाण्याचे आशिष गजभिये यांनी सहकार्य केले. 
 

असा झाला सौदा 

वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच दिल्ली येथील दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याच्या शोधात चमू रवाना केली. या चमूने बाळाच्या आई-वडिलाला सोबत घेतले होते. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोलिसांची चमू पोहोचली. येथे दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याला ताब्यात घेत वडनेर गाठण्यात आले. येथून या मुलाला घेऊन पोलिसांची चमू सेवाग्राम रुग्णालयात दाखल झाली. येथे त्याच्या आरोग्याची तपासणी करून त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत त्याची आई आहे. सध्या या बाळाचे वय एक महिना असल्याचे सांगण्यात आले आहे. कुटकी येथील प्रदीप म्हैसकर आणि त्याची पत्नी प्रणाली तसेच दिल्ली येथील दाम्पत्य अमित भानुप्रसाद भारद्वाज (वय 35) तसेच त्याची पत्नी प्रिया दोन्ही रा. नोएडा, दिल्ली हे चारही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. 
 

शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करार 

चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली. अनधिकृत दत्तक देण्याचा प्रकार साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपवर झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. जिल्हा बाल संरक्षण विभागाला या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हा प्रकार उजेडात आला. प्रकार उजेडात येताच वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तत्काळ कारवाई करून दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याचा शोध घेत त्यांना दिल्ली येथून ताब्यात घेतले. 
 

आजोबा-आजीच्या तक्रारीवरून प्रकार उघड 

अनधिकृतरीत्या झालेल्या या दत्तक प्रकरणाची माहिती बाळाचे आजोबा आणि आजीला मिळाली. त्यांनी लगेच जिल्हा बाल संरक्षण विभागाला याची माहिती दिली. या विभागाच्या अधिकारी माधुरी भोयर यांनी तत्काळ याची चौकशी करून पोलिसांना माहिती दिली. यावरून गुन्हा दाखल झाला आणि आरोपींना अटक करण्यात आली. 
 

70 हजार रुपये मिळाले ऍडव्हान्स 

दोन लाख रुपयांत झालेल्या या सौद्यातील 70 हजार रुपये मुलाच्या आई-वडिलांना मिळाले. उर्वरित रक्‍कम जुलै महिन्याच्या 13 तारखेला मिळणार होती, असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. ही रक्‍कम अद्याप जप्त करण्यात आली नसून, कारवाईदरम्यान ती जप्त करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 
 

दोन लाखांत व्यवहार 
बाळाला घेऊन पोलिसांची चमू वडनेरला दाखल झाली. तेथून या बाळाची आरोग्य तपासणी करण्याकरिता त्याला सेवाग्राम रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्याचे स्वॅब घेण्यात आले. त्याची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे. या प्रकरणात दोन लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. ही रक्‍कम जप्त करण्याची जबाबदारी पोलिसांची असून, त्यांचा तपास सुरू आहे. 
- माधुरी भोयर ,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, वर्धा 

 
चौकशीअंतीच निर्णय 
दत्तक प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांसह दिल्ली येथील दाम्पत्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात पैशाचा व्यवहार झाला. पण, तो चौकशीचा भाग आहे. व्यवहार झालेली रक्‍कम चौकशीअंती जप्त करू. या संदर्भात चौकशीअंतीच काय ते सांगता येईल. 
ए. के. गजभिये, ठाणेदार, वडनेर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi couple illegally adopts 15 day old baby