अमरावतीत कोविड रुग्णालयातच गर्भवती महिलेची प्रसूती!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

बाळंत महिला आणि तिचे बाळ दोघेही स्वस्थ आहेत. या प्रसूतीच्या निमित्ताने कोविड रुग्णालयात स्वतंत्र चिकित्सा कक्ष (ऑपरेशन थिएटर) तयार करण्यात आला आहे.

अमरावती : कोरोनाने जगासमोर नवे प्रश्‍न उभे केले आहेत. कोरोनाच्या या वादळातही काही सुखद चमत्कारही घडत आहेत. कोरोना भस्मासुरासारखा वाढत असतानाच अमरावतीतील एका गर्भवतीलाही कोरोनाची लागण झाली आणि तिच्यासह तिच्या बाळाच्या सुरक्षेचा प्रश्‍न वैद्यकीय क्षेत्रापुढे उभा राहिला. इतकी गुंतागुंत निर्माण करणारा हा एकमेव आजार असावा. या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला कोविड रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथेच स्वतंत्र कक्ष उभारून तिचे बाळंतपणही करण्यात आले. बाळंत महिला आणि तिचे बाळ दोघेही स्वस्थ आहेत. या प्रसूतीच्या निमित्ताने कोविड रुग्णालयात स्वतंत्र चिकित्सा कक्ष (ऑपरेशन थिएटर) तयार करण्यात आला आहे.

स्थानिक यशोदानगर भागातील महिलेला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निदान चाचणीतून झाल्याने तिला शनिवारी (ता. 13) जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गरोदर महिला कोरोनाबाधित असल्याने तिच्या प्रसूतीचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयातच स्वतंत्र प्रसुती कक्ष तयार करण्यात आला. सोमवारी (ता. 15) संबंधित महिलेची प्रसूती होऊन तिने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन तब्बल सहा पौंड (तीन किलो) आहे.

संबंधित प्रसूती ही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी सिझेरिअनद्वारे केली. बाळ आणि बाळंत महिलेची प्रकृती चांगली आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - कोरोनाचा वार, नागपुरात पाच वस्त्या सील
कोरोनाबाधित महिलेने जन्म दिलेल्या बाळाला कोरोनाचे संक्रमण आहे किंवा नाही, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. दुधाची गरज असल्याने बाळाला आईजवळ न्यावे लागते. नवजात बाळाच्या कोरोना चाचणीसंदर्भात भारतीय वैद्यक व संशोधन परिषदेची स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) आहे. त्यानुसार वैद्यकीय तज्ज्ञ निर्णय घेतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delivery of pregnent woman in covid hospital