अजबच! कराचा भरणा केल्यावरही पुन्हा मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

वानाडोंगरी नगर परिषद कारभाराबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. उलट तक्रारदारांनाच नोटीस पाठवून दमदाटी करण्यात येत असल्याचे अर्जदाराने सांगितले. तरी या बाबीची चौकशी करावी अशी मागणी नितेश भारती यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

वानाडोंगरी (जि.नागपूर) : वानाडोंगरी नगर परिषदेच्या अंतर्गत एका मालमत्ताधारकांनी आपल्या मालकीच्या घराचा चालू वर्षाचा कर भरलेला असतानाही पुन्हा कर मागणी देयक त्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्‍तीला धक्का बसला असून भरलेले पैसे कुणी फस्त तर केले नाहीना, असा संशय येऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांनी या बाबीची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

वानाडोंगरी नगर परिषदेचा भोंगळ कारभार
अर्जदार नितेश वासुदेव भारती (रा.प्रभाग क्रमांक 9,महाजनवाडी) यांनी प्राप्त मागणी देयकाप्रमाणे 27 जून 2019ला मालमत्ता क्रमांक 4017चे एक हजार आठशे आठ रुपये त्यांच्या आईच्या नावाने भरून पावती पुस्तक क्रमांक -3मधील पावती क्रमांक 264 प्राप्त केली. अशाप्रकारे सन 2019-20 चा घराचा कर भरलेला असतानाही पुन्हा 2 ऑगस्ट 2019ला पावती 6089 क्रमांकाचे त्याच मालमत्ता कराचे मागणी देयक पाठविण्यात आले आहे. मागील नगर परिषद निवडणुकीच्या वेळी नितेश भारती यांनी संपूर्ण कराचा भरणा केलेला असतानाही दुसऱ्यांदा आलेल्या देयकामध्ये मागील 180 रुपये बाकी दाखविलेले आहे. पंधरा दिवसांत देयकाप्रमाणे रक्कम भरण्याचे आदेश देऊन न भरल्यास कारवाईची तंबी देण्यात आली आहे. अर्जदाराने संबंधित सर्व वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली आहे. मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तक्रारदारांना भेटायला सांगा, असे उत्तर दिले जाते. वानाडोंगरी नगर परिषद कारभाराबाबत जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. उलट तक्रारदारांनाच नोटीस पाठवून दमदाटी करण्यात येत असल्याचे अर्जदाराने सांगितले. तरी या बाबीची चौकशी करावी अशी मागणी नितेश भारती यांनी वरिष्ठांकडे केली आहे. सदया तालुक्‍यात जि.प.पं.स. निवडणुकीचे वातावरण तापत असताना ऐन निवडणुकींच्या तोंडावर कर न भरल्याचा देखावा निर्माण करून निवडणुकीत उभे राहू इच्छिणा-यांना अडविण्यासाठी हे राजकारण तर नव्हे ना , असा सवाल करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand again even after payment of tax