जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावले डॉक्टर्स; आता घेतला आक्रमक पवित्रा

प्रसाद नायगावकर
Thursday, 1 October 2020

मध्यस्थीसाठी आलेल्या विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्यासोबतची बैठकही बारगळली. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. उलट आता राज्यभर त्याचे पडसाद उमटतील, अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलनकर्त्यांना विविध २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेले डॉक्टर्स आता अधिक आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना येथून हटवत नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे. त्यांना विविध २५ संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे दिसून येत आहे.

वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंह यांनी चर्चा केली. पण ही चर्चा निष्फळ ठरली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन अद्यापही थांबण्याच्या स्थितीत नाही आहे.

जाणून घ्या - चिता रचली, साहित्य आणले अन्‌ तो जिवंत झाला,  सारेच अवाक् 

मध्यस्थीसाठी आलेल्या विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्यासोबतची बैठकही बारगळली. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. उलट आता राज्यभर त्याचे पडसाद उमटतील, अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलनकर्त्यांना विविध २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

आरोग्य यंत्रणा कोलमडली

यवतमाळचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ जारी केला आहे. आंदोलक वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चेस तयार आहे, असे त्यांनी यात सांगितले आहे. दरम्यान आज यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यवतमाळ येथे येत आहेत. त्यांच्यासोबत चर्चेनंतर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना दरम्यान हा संप केला गेल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. यामुळे लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for transfer of District Collector in Yavatmal