कारची मागणी करीत नवरदेवाने मोडले लग्न

संतोष ताकपिरे 
Friday, 18 September 2020

बडनेरा पोलिसांनी औरंगाबादच्या भावी वरासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या युवतीचे लग्न औरंगाबाद येथील युवकासोबत 11 मार्च 2020 रोजी जुळले. पसंतीनंतर दोघांचा त्याच दिवशी साखरपुडा झाला.

अमरावती  : लग्न म्हटले की वरपक्षाकडील रूसणे आलेच. वराकडील मंडळींच्या खातीरदारीमध्ये कोणतीही कमी राहू नये, यासाठी वधूपक्षाकडील मंडळींचा आटापिटा सुरू असतो. मानपानासंबंधीचे रुसवे-फुगवे सहन केले जातातही, परंतु मुद्दा हुंड्याचा असेल तर सारेकाही ठरल्यानुसार होते. ऐनवेळी वरपक्षाने डिमांड वाढवली तर प्रकरण मोडण्यावर येते. असाच काहिसा प्रकार अमरावतीत उघडकीस आला.  

साखरपुड्यानंतर वधूपित्याने होणाऱ्या जावयाची हौस म्हणून एक लाख 37 हजारांची सोन्याची चेन दिली. त्यानंतरही मागणी वाढत गेली. ऐनवेळी कारची मागणी करून वराकडील मंडळींनी लग्न मोडल्याचा आरोप वधूपक्षाने केला असून, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

 
बडनेरा पोलिसांनी औरंगाबादच्या भावी वरासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या युवतीचे लग्न औरंगाबाद येथील युवकासोबत 11 मार्च 2020 रोजी जुळले. पसंतीनंतर दोघांचा त्याच दिवशी साखरपुडा झाला. साखरपुडा आटोपल्यानंतर तिने आपल्या नवीन आयुष्याबद्दल भावी जोडीदारासोबत फोनवरून चर्चा सुरू केली. 

परंतु, लग्न जुळल्यानंतर काही दिवसांतच वरासह त्याच्या कुटुंबीयांनी मुलीसह तिच्या पालकांना फोन करून हुंड्याची मागणी केली. एक कार, सोन्याची चेन, घड्याळ, अंगठीसह इतर वस्तू दिल्या नाही तर लग्न तोडण्याची धमकी दिली. 13 सप्टेंबर 2020 रोजी नवरदेवाने वधूपित्याकडे सोन्याची चेन मागितली.

वधूपित्यानेही तातडीने एक लाख 37 हजारांची चेन होणाऱ्या जावयास घेऊन दिली. त्यानंतर पुन्हा वधूपित्याकडे कारची मागणी रेटून धरली. वरासह त्याच्या कुटुंबीयांनी वधूला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप भावी वधूने बडनेरा ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय दिलीप श्रीमाळी (वय 25), दिलीप श्रीमाळी (वय 60), शुभम दिलीप श्रीमाळी (वय 23, सर्व. रा. औरंगपुरा, औरंगाबाद) सह एक महिला अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 

वराकडील बाजू ऐकल्यानंतर पुढील कारवाई
प्राप्त तक्रारीनंतर हुंडाप्रतिबंधक कायद्यान्वये औरंगाबादच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कायद्यातील तरतुदीनुसार वरपक्षाची बाजू समजण्यासाठी बयाण नोंदविल्यावर पुढील प्रक्रिया होईल.
-पंजाब वंजारी, पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demanding a car, bride broke up the marriage