वानाडोंगरीत डेंगीने युवतीचा मृत्यू; महिलांची नगर परिषदेवर धडक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

वानाडोंगरी परिसरातील चार ते पांच रुग्णांना डेंगीची लागण झाली होती. तसेच नगरसेविका वंदना मुळे यांच्या पतींनासुद्धा डेंगीची लागण झाली होती. 

वानाडोंगरी, (जि. नागपूर) : नगरपरिषदेला स्वच्छ-सुंदर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना विजयनगर परिसरात राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीचा डेंगीने मृत्यू झाला. शारदा कृष्णा मेश्राम असे डेंगीच्या आजाराने मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे वानाडोंगरी शहरातील अस्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

वानाडोंगरीच्या विजयनगर येथे राहणारी शारदा मेश्राम ही आरोग्यविषयक शिक्षण घेत होती. तिला ताप आल्याने परिसरातीलच शालिनीताई मेघे हॉस्पिटल व लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तिला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारावर चार ते पाच लाख रुपये खर्च करूनही कृष्णा मुलीला वाचऊ शकले नाहीत.

नगर परिषदेवर मोर्चा 
शारदाच्या मृत्यूनंतर मात्र नागरिक संतापले. विशेषत: महिलांनी अस्वच्छतेचा प्रश्‍न उचलून धरला. विजयनगर येथील संतप्त नागरिकांनी गुरुवारी वानाडोंगरी नगर परिषदेवर मोर्चा काढून मुख्याधिकारी भारत नंदनवार यांना घेराव घालून निवेदन सादर केले. यापूर्वी वानाडोंगरी परिसरातील चार ते पांच रुग्णांना डेंगीची लागण झाली होती. तसेच नगरसेविका वंदना मुळे यांच्या पतींनासुद्धा डेंगीची लागण झाली होती. 

रिकामे भूखंड डासांचा अड्डा 
वानाडोंगरी परिसरातील विविध परिसरात रिकाम्या भूखंडावर जागोजागी सर्वत्र सांडपाणी साचलेले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच ठिकाणी डुकरांचा वावर असल्याने आणखीच घाण व दुर्गंधी वाढली आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोईस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue kills youth in Wanadongari