गडचिरोली : मोहापासून दारू नाही, बनवा आणखी काही : उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचाही प्रश्न लवकरच सोडवणार
कॅप्शन : गडचिरोली : पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम.
कॅप्शन : गडचिरोली : पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम.Sakal

गडचिरोली - राज्य सरकारने मोहफुल तसेच फळांपासून मद्य निर्मितीचा निर्णय घेतला असला, तरी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून ती उठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या मोहफुलांपासून येथे दारू तयार करता येणार नाही. पण, या फुलांपासून इथेनॉल, आर.एस. (रेक्टिफाईड स्पिरीट), न्युट्रीफाईड अल्कोहोल तयार करता येईल. त्यासाठी स्थानिकांमधून कुणी पुढाकार घेतला किंवा मोहफुलांच्या संयुक्त शेतीसाठी पुढे आले, तर त्यांना नक्कीच मदत करू, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी शुक्रवार (ता. २९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, युवानेते ऋतुराज हलगेकर आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संपूर्ण राज्याच्या गाडा चालवताना गडचिरोली जिल्ह्याकडेही आमचे विशेष लक्ष आहे. येथील परिस्थिती कशी आहे आणि जिल्ह्यालगत असलेल्या तेलंगणा, छत्तीसगड आदी राज्यांतील परिस्थिती कशी आहे, यासंदर्भात माहिती घेतली. पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आदींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पूर्वी एखाद्या अधिकाऱ्याला गडचिरोली जिल्ह्यात रुजू होणे ही शिक्षा वाटायची. पण, आता अनेक अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्यास स्वत:हून विचारणा करतात. हे बदललेले चित्र सुखावणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित रेल्वे प्रश्न लवकरच सुटणार आहे. रेल्वे तसेच विमानतळाच्या धावपट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यांना मुंबईला यायला सांगितले आहे. तेथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी व माझ्या विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावू. गडचिरोली जिल्ह्यात पोलाद कारखाना उभारण्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. यात कंपनी जवळपास २० हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे. टाटा सोबत कौशल्यविकासासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त भागांत पोलिस खबऱ्या म्हणून मारल्या जाणाऱ्या व्यक्तींचे कुटुंब उघड्यावर पडते. त्यामुळे त्यांना भरीव आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. तसेच पोलिस खबऱ्यांचे मानधन चार हजार ऐवजी आठ हजार करणार आहे. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात पालममंत्री असताना एक हजार कोटीचे तीन मोठे पूल बांधले, अनेक विकासकामे केली त्यामुळे या जिल्ह्याचे चित्र बऱ्यापैकी बदलल्याचे ते म्हणाले.

भोंग्यापेक्षा पोट महत्त्वाचे...

सध्या सुरू असलेल्या भोंगावादाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता या पुरोगामी महाराष्ट्रात भोंग्याच्या आडून धार्मिक राजकारण होणे हे दुर्दैवाचे असल्याचे ते म्हणाले. भोंगे वाजविण्यापेक्षा गरिबांच्या पोटाची भूक मिटविणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे या गोष्टींपेक्षा विकासावर लक्ष केंद्रित गरजेचे असल्याचे ते म्हणाले. भाजप-मनसे युतीबद्दल त्यांनी सावध पवित्रा घेत निवडणुकीच्या हंगामात कुणाची कुणाशीही युती होऊ शकते. पण, युती करण्यापेक्षा ती टिकविणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com