esakal | आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

desaiganj forest department made water bottles from bamboo in gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वनविभागाद्वारे संचालित सामान्य सुविधा केंद्राने बांबूची अनोखी बाटली तयार केली आहे. त्याद्वारे नैसर्गिक चवीचे आणि आरोग्य रक्षण करणारे पाणी पिता येणार आहे.

आता बांबूच्या बाटलीने प्या पाणी, नैसर्गिक चवीसोबत आरोग्याचंही रक्षण

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : बदलत्या काळात घराघरात आरओ मशिन्स दाखल होत असल्या तरी पुन्हा एकदा जुनेच तांब्या, पितळेचे भांडे व आपले पूर्वज वापरत असलेल्या वस्तूंकडे नागरिकांचा ओढा वाढला आहे. त्यातूनच सध्या तांब्यासारख्या धातूच्या बाटल्याही मिळू लागल्या आहेत. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वनविभागाद्वारे संचालित सामान्य सुविधा केंद्राने बांबूची अनोखी बाटली तयार केली आहे. त्याद्वारे नैसर्गिक चवीचे आणि आरोग्य रक्षण करणारे पाणी पिता येणार आहे.

निसर्गाचे वरदान लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बांबू व इतर लाकडांचा वापर करून विविध वस्तू तयार करत सर्वसामान्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी देसाईगंज येथे वनविभागाने 1 जानेवारी 2012 रोजी सामान्य सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलीटी सेंटर) प्रारंभ केले होते. बांबू, काष्ठशिल्प व विविध कलाप्रकारात पारंगत असलेले कांतिलाल गजभिये या केंद्राचे व्यवस्थापन बघतात. सुरुवातीला या केंद्राचा भर सजावटीच्या वस्तू तयार करण्यावर होता. त्यानंतर येथे आलेले उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर यांनी केंद्राची प्रगती होण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. त्यांच्या मार्गदर्शनात सर्वसामान्य नागरिकांना उपयोगाच्या ठरतील, अशा वस्तू बनविण्यावर भर देण्यात आला. मागील काही वर्षांत नागरिक शुद्ध पेयजलाबद्दल बरेच सजग झाले आहेत.

हेही वाचा - यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ; एक लाख हेक्टरवर पेरणी, तर दोन लाख हेक्टरचे नियोजन

बहुतांश नागरिक आता स्वत:ची पाण्याची बाटली वापरतात. पूर्वी प्लास्टिकची बाटली वापरली जायची. पण, आता थंड पाणी थंड व गरम पाणी गरम ठेवणाऱ्या थर्माससारख्या स्टील व तांब्याच्या महागड्या बाटल्याही वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी मातीच्या बाटल्यांचाही वापर सुरू झाला आहे. पण, मातीची बाटली फुटण्याची भीती असते. त्यामुळे याहून एक पाऊल पुढे टाकत व निसर्गाच्या अधिक जवळ जात बांबूपासून बाटली तयार करण्यात आली. यात दोन प्रकार आहे. एका प्रकारात केवळ ही बांबूची बाटली वापरता येऊ शकते किंवा दुसऱ्या प्रकारात या बांबूच्या बाटलीत आपली आवडती स्टिलची, तांब्याची बाटली ठेवूनही वापर करता येतो. याशिवाय आतून स्टीलचे आवरण असलेले बांबूचे ग्लास व कपही तयार करण्यात आले आहेत. याशिवाय या केंद्रात बांबूपासून डायरीचे कव्हर तयार करण्यात आले असून त्यात आपले नावही मुद्रित करता येते. सध्या या नवीनतम वस्तूंची मागणी वाढली आहे.

हेही वाचा - शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू, शाळा सुरू होताच वाढला प्रचाराचा जोर

अनेक अनोखे साहित्य -
या केंद्रात बांबू, लाकूड व इतर साहित्यापासून 30 ते 35 उत्पादने बनविण्यात येतात. सध्या 16 उपयोगी उत्पादनांवर अधिक भर देण्यात येत आहे. यात वॉलपिस, टेबल लॅम्प इतर सजावटीच्या वस्तूंसोबत बांबू बॉटल, ग्लास, कप, डायरी, घड्याळ, अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे.

हेही वाचा - वाचाच एकदा! उंदीर, मांजर, वानरंही काही कमी नाही; पावणेपाच हजार नागरिकांना घेतला चावा

'गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक साधनांपासून तयार केलेल्या या वस्तू नागरिकांच्या उपयोगी ठरत आहेत. त्यामुळे या केंद्रात काम करणाऱ्या सर्वांना चांगला रोजगार प्राप्त झाला आहे. आम्ही येथील उत्पादन व विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्राहकांचा प्रतिसाद वाढला, तर अशी अनेक केंद्रे निर्माण होऊन मोठी रोजगारनिर्मिती होऊ शकते.'
- निरंजन विवरेकर, उपवनसंरक्षक, वनविभाग, देसाईगंज
 

loading image
go to top