देशमुख गुरुजी ठरले सावरगाव बंगला शाळेचे एक दिवसाचे मुख्याध्यापक 

Deshmukh guruji
Deshmukh guruji

श्रीरामपूर (पुसद) : "नायक' या हिंदी चित्रपटात एक दिवसाचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जनतेची मने जिंकतात व पद सोडताच सर्वांचे डोळे पाणावतात. त्याचप्रमाणे शाळेत एक दिवसाच्या मुख्याध्यापकांनी चिमुकल्यांची मने जिंकून त्याच दिवशी सेवानिवृत्ती घेताच सर्वांचे डोळे पाणावले. 

मुख्याध्यापकपदाचा पदभार स्वीकारला 

शिक्षक हनुमंतराव देशमुख यांनी शाळेच्या मुख्याध्यापकपदाची पदोन्नती स्वीकारली. त्याच दिवशी त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागल्याचा प्रसंग पुसद तालुक्‍यातील सावरगाव बंगला शाळेत घडला. पुसद तालुक्‍यातील गौळ केंद्रातील पांगरवाडी या दुर्गम भागातील सहायक शिक्षक हनुमंतराव देशमुख यांना यवतमाळ जिल्हा परिषदेने सोमवारी (ता.30) मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिली. समुपदेशनाने उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून देशमुख गुरुजींना सावरगाव बंगला येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेत नियुक्ती दिली. पूर्वीच्या शाळेतून मंगळवारी (ता.31) सकाळी देशमुख यांनी कार्यमुक्त होऊन सावरगाव बंगला येथील शाळा गाठली व उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदाचा पदभार स्वीकारला. शाळेतील शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये रममाण होऊन त्यांचे तोंड गोड केले आणि काही तासांतच त्यांना नियतवयोमानाने सेवानिवृत्त व्हावे लागले. 

शाल, श्रीफळ देऊन दिला निरोप 

निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुसद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव साखरे, शिक्षक संघटनेचे अनिल उत्तरवार, मंचकराव देशमुख, पुसद अर्बन क्रेडिट सोसायटीचे संचालक किसन भुरके, प्रभारी मुख्याध्यापक मनोज रामधनी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमंत देशमुख यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना देशमुख हे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमाने गहिवरले होते. 

तीन शिक्षकांना तत्काळ लाभ 

जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सदस्य चितांगराव कदम व शिक्षक संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून पुढाकार घेत पदोन्नती करण्याची मागणी रेटली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी नुकतेच समुपदेशनाने शिक्षकांची सेवाज्येष्ठतेने उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती केली. यामुळे जिल्ह्यातील जवळपास 150 उच्च प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक मिळालेत. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या तीन शिक्षकांना तत्काळ पदोन्नतीचे आदेश देऊन लाभ दिला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com