ग्रामीण भागात शौचालयांचा वापर बैलांचा चारा, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी; कधी थांबणार लोटा परेड?

file photo
file photo

सिरोंचा (जि. गडचिरोली) : केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागांत स्वच्छतेच्या बाबतीत भर दिला आहे. यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायत कामाला लागली आहे. मात्र, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागांत अनेकांना शौचालये बांधून दिल्यानंतरही त्यांची शौचास बाहेर जाण्याची सवय सुटल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या महत्त्वाच्या अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक यापासून अद्याप अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. आजही ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व नीट कळलेले नाही. नगरपालिका, नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना या बाबतीत हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक कुटुंबांतील व्यक्ती शौचालयाचा वापर कमी व मोबाइल फोनचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसून येतात.

शौचालय बांधकामाची सक्ती करण्यात आली असूनसुद्धा त्याच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी घरी शौचालय बांधकाम करूनही त्या शौचालयाचा वापर न करता अनेक नागरिक उघड्यावर जाणेच पसंत करतात. शासनाकडून घरकुल बांधकाम करताना शौचालय बांधकाम करणे आवश्‍यक असल्याची अट ठेवण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिक या नियमाला अपवाद ठरत आहेत.

अर्धवट शौचालय बांधकाम करून शासन व प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. यात ग्रामीण भागातील ग्रामसेवकसुद्धा सहकार्य करीत आहेत. शासनाकडून शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते. शौचालयाकरिता मिळत असलेल्या अनुदानातून काही रक्कम बांधकामासाठी खर्च करून उर्वरित रकमेची लाभार्थी उधळपट्टी करत आहेत. विज्ञान युगात प्रत्येक व्यक्तीला मोबाईल फोन असणे आवश्‍यक आहे. तसेच प्रत्यक्ष शौचालय असणेसुद्धा फार महत्त्वाचे आहे. तेव्हा कुठे शासनाची गाव हागणदारीमुक्त ही संकल्पना पूर्ण होऊ शकेल.

मात्र, नागरिकांनी या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने बऱ्याच गावांना स्वच्छता टिकवून ठेवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही भागांत शौचालय बांधकाम करूनसुद्धा त्याचा वापर होत नाही. शौचालयाचा वापर बैलांचा चारा, जळणाची लाकडे व अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालयांचे महत्त्व कळणार तरी केव्हा हा मोठा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे.

कुठे गेली गुड मॉर्निंग पथके?

हागणदारीमुक्त गाव तसेच स्वच्छता अभियान भरात असताना अनेक नगरपालिका, नगरपंचायतींनी गुड मॉर्निंग पथके तयार केली होती. या पथकातील अधिकारी, कर्मचारी सकाळी नागरिक उघड्यावर शौचास बसतात अशा ठिकाणी जाऊन गांधीगिरी मार्गाने त्यांना फूल द्यायचे किंवा ढोल, ताशे वाजवून लोट्यासह हार घालून त्यांचा सत्कार करायचे. काही ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन उघड्यावर बसणाऱ्यांचे लोटे जप्त करून आर्थिक दंडही ठोठावण्यात आला होता.

लोकलाजेचा प्रसंग ओढवू नये

सुरुवातीला उत्साहात काम करणारी ही पथके हळूहळू कमी होऊ लागली. आता या पथकांचे कुणी नावही घेत नाही. पूर्वी या पथकांना ग्रामीण भागांतील नागरिक बरेच घाबरून असायचे. आपला असा अनोख्या पद्धतीने सत्कार होऊन लोकलाजेचा प्रसंग ओढवू नये म्हणून कित्येकांनी घरी बांधलेले शौचालय वापरणे सुरू केले होते. पण, आता हे पथक कुठेच दिसत नाही.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com