गडचिरोली शहरात आढळले दुर्मीळ खवल्या मांजर; वनविभागाने केले निसर्गमुक्त

गडचिरोली : दुर्मिळ खवल्या मांजरासह वनविभागाचे अधिकारी.
गडचिरोली : दुर्मिळ खवल्या मांजरासह वनविभागाचे अधिकारी.

गडचिरोली : जंगलातील अतिशय लाजाळू व अतिदुर्मीळ खवल्या मांजर (पॅंगोलिन) शनिवारी (ता. १२) गडचिरोली शहरातील सर्वोदय वॉर्डात रात्री आठ वाजताच्या सुमारास आढळून आले. त्याला वनविभागाने ताब्यात घेऊन रविवारी दूर घनदाट जंगलात निसर्गमुक्त केले.

गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावरील एआरबी ट्रॅव्हल्सच्या मागील परिसरात खोब्रागडे नावाच्या वृद्ध महिलेच्या अंगणात खवल्या मांजर आढळले. त्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून या दुर्मीळ प्राण्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी झाल्यानंतर रविवारी त्याला जंगलात सोडण्यात आले.

यावेळी गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, क्षेत्र सहायक जेनेकर, सर्पमित्र अजय कुकडकर, क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे आदींची उपस्थिती होती. खवल्या मांजर अतिशय दुर्मीळ असून निशाचर प्राणी आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात आराम करते व रात्रीच्या सुमारास बाहेर निघते. मुंग्या व वारूळातील वाळवी हे त्याचे आवडते खाद्य आहे. त्यांना ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. त्या अंगावर जाडसर खवले असल्यानेच त्याला खवल्या मांजर म्हणतात.

धोक्याची सूचना मिळताच शरीर करते वेटोळे

कोणत्याही प्रकारच्या धोक्‍याची चाहूल लागताच ते आपल्या शरीराचे वेटोळे करून घेते, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा प्राणी निशाचर असल्याने जंगलात सहसा दिसत नाही. त्याच्या हालचाली रात्रीच असतात. दिवसा चुकून बाहेर पडले; तरी धोक्‍याची चाहूल लागताच ते आपल्या शरीराचे वेटोळे करून स्तब्ध पडून राहते. त्याच्या मातकट, तपकिरी रंगामुळे ते परिसरात असे बेमालूमपणे दडते की, त्याला सहजासहजी शोधता येत नाही. त्यामुळे या प्राण्याचे दिवसा क्‍वचितच दर्शन होते. पण, रात्रीच्या वेळेस हा प्राणी जंगलात विशेषत: वारूळांच्या जवळपास दिसू शकतो.

तस्करीची शक्‍यता...

खवल्या मांजर हा अतिशय दुर्मीळ प्राणी असल्याने त्याच्याविषयीच्या अनेक दंतकथा, अंधश्रद्धांमुळे त्याच्या विविध अवयवांची देश-विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे या प्राण्याला पकडून त्याची तस्करी करण्यात येते. यापूर्वी वनविभागाने अशी काही प्रकरणे उघडकीस आणली आहेत. जैवविविधतेत अतिशय महत्त्वाचा स्थान असलेला हा वन्यजीव अतिशिकार व तस्करीमुळे दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. त्यामुळे या दुर्मीळ वन्यजीवाच्या संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com