हेच का ते अच्छे दिन?.....

old man akola.jpg
old man akola.jpg

अकोला : टाळेबंदीमुळे समाजातील प्रत्येक घटकाची होरपळ होत आहे. त्यामध्ये निराधारांचा सुद्धा समावेश आहे. कोणाचेही आधारवड नसल्याने केवळ पेंशनच्या (मानधन) भरवश्‍यावर गुजराण करणाऱ्या या निराधारांचे मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन रखडले आहे. परिणामी जिल्ह्यातील 30 हजारांवर निराधारांसमोर आपत्तीच्या या काळातच आर्थिक संकट उभे राहिले आहे. उतार वयात मिळणारे तुटपुंजे मानधन सुद्धा वेळेवर मिळत नसल्याने निराधारांसमोर उदरनिर्वाहाचा ही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

उतार वयात निराधारांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्यांना शासनामार्फत पेंशन (मानधन) देण्यात येते. अनुदानाची रकम लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे (डीबीटी) जमा करण्यात येते.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 30 हजारावर निराधारांना पेंशन (मानधन) देण्यात येते. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हा प्रशासनाकडे निराधारांना पेंशन देण्यासाठी निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 30 हजारावर निराधार पेंशनसाठी बॅंकांच्या चकरा मारत आहेत. त्यामुळे आधीच तुटपुंज्या अनुदानामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या निराधार, वृद्ध व गरीबांसमोर उपजीविका प्रश्न निर्माण झालेला आहे. 

तोडक्या अनुदानाने उपजीविकेचा प्रश्न
केंद्र सरकारने खासदार व राज्य सरकारने आमदारांच्या मानधनात भरीव वाढ केली आहे. तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुद्धा लागू करण्यात आला आहे. परंतु दुसरीकडे निराधार, वृद्ध व गरीब लाभार्थ्यांना एक हजार रुपये तोकडे अनुदान देऊन शासन त्यांची थट्टाच करत आहे. 

टाळेबंदीने कोसळले आर्थिक संकट
टाळेबंदीचा समाजातील प्रत्येक घटकावर विपरित परिणाम होत आहे. निराधारांना सुद्धा त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील निराधार शेती व इतर कामं करुन टाळेबंदीपूर्वी उपजीविका चालवत असतानाच आता टाळेबंदीने त्यांच्या हातचे काम सुद्धा गेले आहे. परिणामी निराधारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. 

असे आहेत लाभार्थी
अकोला महानगरपालिका क्षेत्रात 4 हजार 526, अकोला तालुक्यात 5 हजार 533, बार्शीटाकळीत 1604, अकोट 6 हजार 821, तेल्हारा 2 हजार 929, बाळापूर 3 हजार 339, पातूर 1 हजार 684, मूर्तिजापूर 3 हजार 833 असे जिल्ह्यात एकूण 30 हजार 269 लाभार्थी आहेत. संबंधितांपैकी 29 हजार 187 लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात 1 हजार रुपये, 103 लाभार्थ्यांना 1100 व 250 लाभार्थ्यांना 1 हजार 200 रुपये मानधन देण्यात येते. परंतु निधीची अडचण असल्याने निराधारांचे मानधन रखडले आहे. 

लवकरच मिळणार तीन महिन्यांची पेंशन 
निराधारांना पेंशन (मानधन) देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नव्हता. नुकताच निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे निराधारांना मार्च, एप्रिल व मे महिन्याची पेंशन एकसोबत देण्यात येईल. 30 एप्रिलपर्यंत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होईल. 
- राहुल वानखेडे
तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, अकोला 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com